उघड्यावर जाणाऱ्यांना बाराशे रुपयांचा दंड, उस्मानाबाद झेडपी प्रशासन खडबडून जागे

सयाजी शेळके
Wednesday, 16 December 2020

ग्रामीण भागात स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात का कुचराई केली. याबाबतचा खुलासा करावा, अशी कारणे दाखवा नोटीस जिल्ह्यातील आठही गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

उस्मानाबाद : ग्रामीण भागात स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात का कुचराई केली. याबाबतचा खुलासा करावा, अशी कारणे दाखवा नोटीस जिल्ह्यातील आठही गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. `पाणंदमुक्ती गेली डब्यात` या सदराखाली `सकाळ`चे वृत्त मंगळवारी (ता. १५) प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेने याची तात्काळ दखल घेत, कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याशिवाय प्रत्येक गावनिहाय नियोजन करण्याचे आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

 

जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी प्रत्येक कुटुंबाला शासनाने स्वच्छतागृह बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान दिले आहे. त्यामुळे जिल्हा २०१७ मध्ये हागणदारीमुक्त झाला आहे. असे असताना जिल्ह्यातील ४० ते ५० टक्के नागरिक उघड्यावर जात असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातून `सकाळ`ने आढावा घेतला होता. `सकाळ`ने याबाबतचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध केले होते. स्वच्छतेचे विदारक वास्तव समोर आल्याने जिल्हा परिषद स्तरावर पळापळ सुरू झाली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या बाबतीत विचारणा केली आहे.

अशी केली विचारणा
प्रत्येक तालुका २०१७ मध्ये हागणदारीमुक्त झाल्यानंतर सूचना देऊनही गावातील स्वच्छता का टिकवून ठेवण्यात आली नाही. गावात स्वच्छता टिकविण्यात अपयश आल्याचे चित्र `सकाळ`च्या वृत्तात दिसून येत आहे. स्वच्छता टिकविताना उघड्यावर जाणाऱ्या किती नागरिकांना नोटीस देण्यात आली आहे. आतापर्यंत किती रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. किती गावामध्ये `गुड मॉर्निंग` पथके कार्यान्वित झाली आहेत, अशी विचारणा करण्यात आली.

 

हे करण्याच्या सूचना
प्रत्येक गावातील ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, आशा वर्कर, पोलिस पाटील, गावातील स्वयंसेवक यांचे गुड मॉर्निंग पथक तयार करावे. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांचे स्वतंत्र गुड मॉर्निंग पथक तयार करून दररोज दोन-तीन गावांना भेटी देऊन कारवाई करावी. उघड्यावर जाणाऱ्याला तात्काळ नोटीस देण्यात यावी. तालुका स्तरावर प्रत्येक गावातून दररोज अहवाल घेण्यात यावा. गावात सलग तीन दिवस दवंडी देण्यात यावी. उघड्यावर जाऊन दुर्गंधी पसरविणाऱ्यास एक हजार २०० रुपये दंड आकारण्यात यावा. बुधवारपासून (ता. १६) गुड मॉर्निंग पथकाची कार्यवाही सुरु करण्यात यावी. गावात कायम स्वच्छता टिकवून न ठेवल्यास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Above One Thousand Rupees Fine For Open Defection Osmanabad