गणेश मंडळांना आता ऑनलाईन परवाने; लातूर पोलिसांचा निर्णय

online
online

लातूर : गणेश मंडळांना पोलिसांकडून मिळणाऱ्या परवान्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारण्याची आणि रांगेत थांबण्याची आता गरज नाही. लातूर पोलिसांनी यातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुटका करत शहर आणि जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जागोजागी गणेश मंडळांची आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी सुरू आहे. वेगवेगळे परवाने घेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यात बराच वेळही जातो. हे लक्षात घेऊन पोलिसांनी यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरबसल्या आपल्या मोबाईलवरून किंवा घरातील लॅपटॉप-संगणकावरून नोंदणी करून पोलिस परवाना मिळवता येऊ शकतो, अशी माहिती अपर पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे यांनी ‘सकाळ’ला दिली.

याकडे लक्ष द्या
महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर गणेश मंडळांची नोंदणी हे ऑप्शन दिसेल, त्यावर किंवा थेट सिटीझन पोर्टलवर जाऊन लॉग-इन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा. त्यानंतर मंडळाची माहिती विचारणारा फॉर्म समोर येईल. त्यात मंडळाच्या स्थापनेपासून विसर्जन मिरवणूकीच्या नियोजनापर्यंतची माहिती भरायची आहे. महापालिका, महावितरण यांच्यासह इतर आवश्यक परवाने घेतले असल्यास ते लगेच अपलोड करायचे आहेत. त्यानंतर अर्ज सबमीट करायचा. त्यानूसार तो त्या-त्या भागातील पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना पहायला मिळेल. ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलिसांकडून लगेचच कार्यकर्त्यांच्या इ-मेलवर परवाना पाठवला जाणार आहे. परवानासुद्धा यंदा पेपरलेस झाला आहे.

ऑफलाईन पद्धत पूर्णपणे बंद
ऑनलाइन पद्धतीने ज्यांना घरबसल्या अर्ज भरता येणार नाही, अशांनी आपल्या भागातील पोलिस स्टेशनमध्ये जायचे आहे. तेथेही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे. तो अर्ज कसा भरायचा, याचे मार्गदर्शन तेथील पोलिस अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये बसून मोबाईलवरूनही कार्यकर्त्यांना अर्ज भरता येणार आहे. हेही शक्य झाले नाही तर शेवटी पोलिस स्वत: ऑनलाईन अर्ज भरून देतील. ऑफलाईन पद्धत यंदा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सिटीझन पोर्टलबाबतचे प्रशिक्षण पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे, असे काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

अधिकृत गणेश मंडळे - 900
एकूण गणेश मंडळे - 1, 800

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com