आता तुरीवर शेंगा पोखणाऱ्या अळीचा  प्रादुर्भाव

tur photo
tur photo

परभणी : मराठवाड्यात सर्वत्र तुरीचे पिक जोमात असले तरी या पिकावर पिकावर सध्या पिसारी पतंग व तुरीवरील शेंगा पोखणारी अळीचे पतंग मोठ्याप्रमाणात आढळून येत आहेत. ही स्थिती तुर शेंगा पोखणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक असल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याबाबत ‘सकाळ’ ने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून उपाययोजना जाणुन घेतल्या आहेत.


अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या तुरीला दिवाळीत झालेला पाऊस पोषक ठरला असला तरी पाणी धरणाऱ्या जमिनीवरील तुर अतिपाण्यामुळे पिवळी पडून करपत आहे. मात्र, अन्य जमिनीवर तुर जोमात असून चांगली वाढ झाली आहे. सद्य स्थितीत तुर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, जोमात असलेली तुर धोक्यात आली आहे. वातावरणात होणारा बदल अळीसाठी पोषक असून या अळीचा प्रादुर्भाव कळया, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. सुरवातीस लहान अळया कोवळी पाने, कळया व फुले कुरतडून खातात. शेवटी शेंगा लागताच अळया शेंगा कुरतडून त्यास छिद्र पाडतात व आपले डोके आत खूपसून दाणे खातात, अशी माहिती ‘सकाळ’ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ.अनंत बडगुजर व डॉ. कृष्णा अंभुरे यांनी दिली आहे.

असे करा व्यवस्थापन :-
 पूर्ण वाढ झालेल्या अळया वेचून त्यांचा नाश करावा, पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावेत, जेणे करून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळया वेचून खातील, शेंगा पोखरणा­या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत जेणे करून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल, तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळया वेळोवेळी गोळाकरून नष्ट कराव्यात, हरभरा पिक एक महिण्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीचे ‘टी’ आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हेक्टर याप्रमाणात लावावेत, दोन अळया किंवा ५ टक्के शेंगाचे नुकसान प्रति मि. ओळ किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळयात सतत २ ते ३ दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून खालील उपाय करावेत.

फवारणीसाठी ही औषधी वापरा
 पिकास फुले येत असताना सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणीकरावी. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच. ए. एन. पी. व्ही. २५० एल. ई. विषाणूची ५०० लिटरपाण्यात मिसळून प्रति हे. फवारणी करावी आणि त्यामध्ये राणीपाल (नीळ) १०० ग्रॅम टाकावा. जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास क्विनालफॉस २० टक्के प्रवाही २० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रॉल १८.५ एस सी ३ मि. ली किंवा लॅमडा सायलोथ्रीन ५ ईसी १० मि. ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे. किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास १० दिवसाच्या अंतराने करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com