अबब..! परभणीचे कापूस संशोधन केंद्र झाले १०१ वर्षांचे 

कैलास चव्हाण
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- शनिवारी शताब्‍दी सोहळ्याचे आयोजन
- शताब्दी पूर्ण करणारे विद्यापीठातील पहिलेच संशोधन केंद्र
- वैविध्यपूर्ण लांब धाग्याचे देशी कापूस वाण या संशोधन केंद्रामार्फत विकसित

परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग फार्मच्या स्थापनेस यंदा १०१ वर्षे पूर्ण झाली असून गतवर्षी काही तांत्रिक अडचणीमुळे राहिलेला शताब्दी सोहळा यंदा शनिवारी (ता. सात) होणार आहे. शताब्दी पूर्ण करणारे हे विद्यापीठातील पहिलेच संशोधन केंद्र आहे.

देशी कापूस पिकावरील संशोधन व विस्तारीकरण या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील महेबूब बाग फार्म येथे कापूस संशोधन केंद्राची सन १९१८ मध्ये निजाम राजवटीत स्थापना करण्यात आली. निजामाच्या कृषी विभागाने परभणीला दोन संशोधन केंद्र दिले आहेत. एक कापूस आणि दुसरे ज्वार. निजाम राजवटी गेल्यानंतर हे केंद्र तत्कालीन मुंबई राज्याच्या अधिपत्याखाली आले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे या केंद्राची मालकी गेली. तर सन १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर हे संशोधन केंद्र कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आले. ११ हेक्टरवर पसरलेल्या या संशोधन केंद्रामार्फत विद्यापीठ स्थापनेपूर्वीच देशी कापसाचे गावरानी १२, गावरानी २२ व गावरानी ४६ हे वाण विकसित करण्यात आले. 

सुधारित लागवड तंत्रज्ञान विकसित
 विद्यापीठ स्थापनेनंतर संशोधन केंद्रामार्फत देशी कापसाचे दहा वाण, जसे की पीए २५५, पीए ४०२, पीए ०८, पीए ५२८, पीए ७४० आणि पीए ८१२ आदी विकसित व प्रसारित करण्यात आले आहेत. देशी व अमेरिकन कापसाच्या आंतरजातीय संकरातून देशी कापसाच्या बोंडाचा आकार व धाग्याची लांबी वाढविण्यात या संशोधन केंद्राने यश संपादित केले आहे. अशा प्रकारे आंतरजातीय संकरातून निर्मित देशी कापूस सरळ वाण पीए ४०२ विकसित करणारे देशपातळीवरील हे पहिलेच संशोधन केंद्र आहे. अमेरिकन कापसाप्रमाणे धाग्यांचे गुणधर्म असलेले वैविध्यपूर्ण लांब धाग्याचे देशी कापूस वाण या संशोधन केंद्रामार्फत विकसित करण्यात आले आहे. याबरोबरच देशी कापूस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

शताब्दी सोहळ्याचे आयोजन 
या संशोधन केंद्राच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी सोहळा शनिवारी (ता. सात)  कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग फार्म, परभणी येथे संपन्न होणार आहे. या वेळी  प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच माजी संचालक डॉ. बसवराज खादी, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रय बापट, विद्यापीठ  कार्यकारी परिषद सदस्‍य डॉ. सुभाष बोरीकर उपस्थित राहणार आहेत. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रक्षेत्र भेटीमध्ये केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृषी विद्यापीठ विकसित व प्रसारित वाण, देशी कापसाचे विविध प्रयोग, विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम आदी पाहता येणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे व कापूस विशेषज्ज्ञ डॉ. खिजर बेग यांनी दिली.

....म्हणून परभणीची निवड
निजाम राजवटीच्या आधीपासून परभणी भागात कापूस आणि ज्वारी या दोन पिकांचे उत्पादन मोठे होते. त्यामुळे निजामाच्या कृषी विभागाने परभणीत १९१८ मध्ये कापूस संशोधन केंद्र स्थापन केले, तर काही वर्षांनंतर ज्वार संशोधन केंद्र स्थापन केले. महेबूब बाग हा परिसर जुन्या परभणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पूर्वीपासून या भागाला महेबूब बाग असे संबोधले जात असल्याने ते नाव या केंद्रास पडले आहे. या केंद्राचे पहिले संचालक हे आंध्रप्रदेशातील पी. व्ही. ओंकारा हे होते. तसा उल्लेख ऊर्दू भाषेत आजही आहे.

नव्या इमारतीत स्थलांतर
या केंद्राच्या स्थापनेच्या वेळी असलेली इमारत धोकादायक झाल्याने २०१० मध्ये नवी इमारत बांधण्यात आली आहे. वेळोवेळी जुन्या इमारतीची डागडुजी करण्यात आल्याने जुनी  इमारतदेखील अजूनही भक्कम स्थितीत आहे. अजही १९१८ पासूनची ऊर्दू भाषेतील सर्व दस्तावेज येथे आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now ..! Parbhani Cotton Research Center became 101 years old