अबब...! परभणी रेल्वेस्थानकाला आग

file photo
file photo

परभणी : येथील रेल्वेस्थानकातील सामान्य श्रेणी प्रतीक्षालयास गुरुवारी (ता. पाच) सांयकाळी अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रतीक्षालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग शार्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

परभणी रेल्वेस्थानकातील सामान्य श्रेणी प्रतीक्षालयास गुरुवारी (ता. पाच) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच रेल्वेस्थानकात एकच धावपळ उडाली. सायंकाळची वेळ असल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील बाजूच्या खिडकीतून आगीचे मोठमोठे लोट बाहेर पडत होते. फलाट क्रमांक एकचा परिसर धुराने व्यापून गेला होता. त्यातच प्रवाशांच्या धावपळीमुळे मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाना फलाट मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब आल्यानंतर अर्ध्या तासानंतर लागलेली आग आटोक्यात आली. या आगीत प्रतीक्षालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच या प्रतीक्षालयात असलेल्या स्वच्छतागृहातील साहित्यही जळून खाक झाले. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरात आग लागण्याची ही सलग दुसरी घटना आहे. बुधवारी (ता. चार) पहाटेही भारतीय स्टेट बॅंकेच्या एटीएमला आग लागून मोठे नुकसान झाले आहे.

रेल्वेची आगरोधक यंत्रणा कुचकामी

रेल्वेस्थानकात असलेली आगरोधक यंत्रणा कुचकामी ठरली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानकात असलेल्या यंत्रांच्या सह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यामुळे आगीने रोद्ररूप धारण केले. त्यामुळे महापालिकेचे अग्निशमन दल येईपर्यंत आगीने संपूर्ण प्रतीक्षालय वेढले होते.

प्रवाशांची रेल्वेरुळावरून धावपळ

ही घटना सायंकाळी पाच वाजता घडल्याने या वेळी रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. या वेळी मुंबईकडून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस, नांदेडकडून मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस व इतर पॅसेंजर गाड्या आलेल्या असतात. त्यामुळे प्रवाशी जास्त असतात. अचानक आग लागल्याने प्रवाशांनी रेल्वेरुळावर उड्या मारून धावपळ सुरू केली.

रेल्वे अधिकाऱ्यांचे मौन

आगीच्या घटनेत झालेल्या नुकसानीच माहिती विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पाहून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. कुणीही या घटनेबाबत बोलत नव्हते. या वेळी रेल्वे सुरक्षाबल व अग्निशमन दलाच्या जवानांशिवाय एकही रेल्वेचा अधिकारी घटनास्थळी दिसून आला नाही.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com