GOOD NEWS : औंढ्याचे सिद्धेश्वर धरण शंभर टक्‍के भरले

sidheshwar photo
sidheshwar photo

हिंगोलीः औंढा नागनाथ तालुक्‍यातील सिध्देश्वर धरण शंभर टक्‍के भरले असून पुढील दोन वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेतीसिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सुटणार आहे. यामुळे बऱ्याप्रमाणात शेती सिंचनाचा प्रश्‍न मिटण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.  

पूर्णा नदीवर उभारलेल्या येलदरी व खडकपुर्णा धरण परतीच्या पावसाने शंभर टक्‍के भरले आहे. त्‍यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने सिध्देश्वर धरणही भरले आहे. यामुळे सिध्देश्वर धरण ते सिध्देश्वर गावापर्यंत असलेल्या सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने या सांडव्याला धबधब्याचे स्‍वरूप आले आहे. त्‍यामुळे येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. 

शेतकऱ्यांना रब्‍बीच्या पिकांसाठी उपयोग
या पाण्यामुळे या भागातून वाहणाऱ्या पुर्णा नदीपात्रात पाणीपातळी वाढत आहे. यामुळे नदीच्या काठावर दुतर्फा शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाल्याने शेतकऱ्यांना रब्‍बीच्या पिकांसाठी त्‍याचा उपयोग होणार आहे. धरणातील पाणी औंढा तालुक्‍यातील शेतीसह नांदेड जिल्‍ह्यास देखील उपलब्ध होते. 

अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार
अपुऱ्या पावसामुळे २०१२ पासून हे धरण शंभर टक्‍के भरले नव्हते. आता हे धरण भरल्याने हजारो हेक्‍टर सिंचनासाठी लाभ होणार असून अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हिंगोली जिल्‍ह्यात २२ हजार ६५८ हेक्‍टर तर नांदेड जिल्‍ह्यात १९ हजार १८८ हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. रब्‍बीतील गहु, हरभरा, तर उन्हाळी भुईमुग, केळी, ऊस यासह इतर बागायती पिकाच्या लावगडीत यामुळे वाढ होणार आहे. 

शेतकऱ्यांसह अनेक गावातील ग्रामस्‍थ देखील समाधानी
या धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या कालव्याच्या दुरूस्‍तीचे काम देखील पाटबंधारे विभागाने हाती घेतले असून त्‍यातील झाडेझूडपे तर अनेक ठिकाणी कालव्याला पडलेल्या भगदाडाची दुरूस्‍ती केली जात आहे. पाणीपाळी सुरू होण्यापुर्वी ही कामे आटोपली जाणार आहेत. धरणात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यामुळे अनेक गावातील ग्रामस्‍थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह अनेक गावातील ग्रामस्‍थ देखील समाधानी झाले आहेत. 

पाण्याच्या विसर्गामुळे काही मार्ग बंद
सध्या धरणाच्या सांडव्यावरून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे औंढा नागनाथ तालुक्‍यातील ढेगज, सिध्देश्वर, पिंपरी तसेच सेनगाव, पुसेगाव, हिंगोलीकडे जाणारा मधला मार्ग पुर्णपणे बंद झाला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com