आता मागासलेपणातून मुक्ती हवी - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

औरंगाबाद - ‘‘मराठवाड्याने जशी निजामापासून मुक्ती मिळवली, तशीच आता आपल्याला मागासलेपणातून मुक्ती हवी आहे. विकासासाठी भुकेल्या या प्रदेशात समृद्धी, विकास करायचा आहे,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी सोमवारी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘‘मराठवाडा मुक्तिसंग्रामात लढ्यामुळेच भारत एकसंध राहू शकला. आता मराठवाड्याला मागासलेपणातून मुक्त करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील सर्वांत मोठी वॉटरग्रीड मराठवाड्यात होत आहे. १४ प्रकल्पांचे पाणी शेती, उद्योग आणि पिण्यासाठी या विभागाच्या कानाकोपऱ्यांत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ऑरिक सिटीच्या माध्यमातून तीन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होईल,’’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सरकार वचनबद्ध असून, मराठवाड्याच्या विकासासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर लिखित ‘मराठवाडा अग्रेसर’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी झाले.

कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, मराठवाडा विकास मंडळाचे भागवत कराड, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांना कोरी निमंत्रणपत्रिका
स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानाची वागणूक देण्याची चाड प्रशासन बाळगत नसल्याचा अनुभव मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनीच आला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या अभिवादन सोहळ्याची चक्क कोरी निमंत्रणपत्रिका स्वातंत्र्यसैनिकांना पाठविली होती. ‘मान देता येत नसेल, तर बोलावताच कशाला,’ असा संतप्त सवाल झुंजार स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com