
परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला होता. जिल्ह्यात एप्रिल 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. एकाच महिन्यात कोरोनाचे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.
परभणी : परभणी जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी एक आनंदवार्ता आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. एप्रिल 2020 पासून शिरकाव झालेल्या या कोरोना संसर्गाचा आलेख आता खाली आला आहे. असे असले तरी संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन अद्यापही करणे गरजेचेच आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला होता. जिल्ह्यात एप्रिल 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. एकाच महिन्यात कोरोनाचे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर कोरोनाचा जिल्हयातील संसर्ग कमी झालाच नाही. तो सातत्याने व तितक्याच गतीने वाढत गेला. वाढता संसर्ग व मृत्युचे प्रमाण अधिक असल्याने प्रशासन व आरोग्य विभागासमोर प्रश्नचिन्ह उभे होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या काळात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या कठोर नियमावलीमुळे परभणीकरांचे आरोग्य चांगले राहिले असेच म्हणावे लागेल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह त्यांच्या अधिनिस्त काम करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांसह महापालिकेतील स्वच्छता कामगारांची या दिवसातील सेवा अतुलनिय ठरली आहे. परंतु असे असतानाही बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात आलेल्या लोकांकडून कोरोना संसर्ग वाढत गेला.
जिल्ह्यातील कोरोनाच्या शिरकावाला या महिन्यात पूर्ण 11 महिने पूर्ण होत आहेत. या 11 महिन्यात परभणीकरांनी कोरोनाशी दोन हात केले. प्रशासनाच्या नियोजनबध्द कारभाराला पूर्ण साथ देत नागरिकांनी देखील कोरोनावर विजय संपादन करण्याचे काम केले. तत्कालिन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे परभणीतील लाखो लोक कोरोनाच्या राक्षसापासून दुर राहिले. आता जिल्ह्यात आलेली कोरोनाची लाट ओसरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
लस आली पण सावधानता ही हवी
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. कारण कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरी धोका अद्यापही संपलेला नाही. अश्या परिस्थितीत आपण थोडे दिवस सावध रहाणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
लसीकरणाबाबत गैरसमज नको
कोरोनावर भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेली लस जगात सर्वात प्रभावी लस म्हणून ओळखली जात आहे. तीचे सध्या लसीकरण सुरु आहे. परंतु आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच लसीकरण करून घेण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यासह पुढील काळात सर्वसामान्यांनी लसीकरण करून घेण्याची गरज आहे.
अशी आहे आकडेवारी
एप्रिल - 02, मे - 87, जून - 35, जुलै - 605, ऑगस्ट - 2,165, सप्टेंबर - 2,593, ऑक्टोबर - 1,156, नोव्हेंबर - 541, डिसेंबर - 419, जानेवारी - 354,
फेब्रुवारी (ता. सहा पर्यंत) - 33