
नांदेड - जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला. यात सोयाबीनचे सर्वाधिक सत्तर टक्के नुकसान झाले, तर कपाशीचीही पन्नास टक्क्यांपेक्षा अधीक हानी झाली. ज्वारीचे पीक सर्वच गेल्यात जमा आहे. पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाचा अाधार तसेच शेतीमालाच्या हमीभावाचा मेळ लक्षात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नांदेड - जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला. यात सोयाबीनचे सर्वाधिक सत्तर टक्के नुकसान झाले, तर कपाशीचीही पन्नास टक्क्यांपेक्षा अधीक हानी झाली. ज्वारीचे पीक सर्वच गेल्यात जमा आहे. पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाचा अाधार तसेच शेतीमालाच्या हमीभावाचा मेळ लक्षात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांचे खरिपातील जिरायती, बागायती तसेच बहुवार्षिक फळपिकांचे एकूण सहा लाख ३१६ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. यात बाधितांना दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख रुपयांची मागणी प्रशासनाकडून नुकतीच करण्यात आली. परंतु, नुकसानीचे क्षेत्र, पीक कापणी प्रयोगातील उत्पादकता, तसेच शेतमालाचे सध्याचे बाजारभाव याचा मेळ घातला असता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान साडेतीन हजार कोटींच्या वर जाते. यातून सोयाबीनचे सत्तर टक्के, कपाशीचे पन्नास टक्के व ज्वारीचे सत्तर ते नव्वद टक्के नुकसान झाल्याचे गृहीत धरता, नुकसानीची आकडेवारी दोन हजार कोटींपर्यंत जाते. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी रक्कम तोकडी असणार, हे मात्र निश्चित.
जिल्ह्यात आठ लाख ७८ हजार ३८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी यंदा आठ लाख तीन हजार ५१० हेक्टरवर पेरणी झाली होती. या पेरणी क्षेत्रापैकी तब्बल सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. यात कोरडवाहू क्षेत्राचे सहा लाख ४८ हजार ७८, बागायती ६१ व बहुवार्षिक फळपिकांच्या १७७ हेक्टरचे नुकसान झाल्याचे सर्व्हेत आढळून आले.
यात सर्वाधिक सोयाबीनचे तीन लाख ७५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यंदा सोयाबीनची पीक कापणी प्रयोगातील उत्पादकता हेक्टरी पंधरा क्विंटल आली आहे. सोयाबीनची तीन हजार सातशे रुपये आधारभूत दर लक्षात घेता सतराशे कोटी रुपये होतात. याच्या सत्तर टक्के नुकसान गृहीत धरले तर सोयाबीनचे बाराशे कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. तर कपाशीचे दोन लाख चार हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. प्रतिहेक्टर दहा क्विंटलचे कापणी प्रयोगातील उत्पादकता लक्षात घेता, कपाशीचे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. या उत्पादनाच्या पन्नास टक्के नुकसान गृहीत धरल्यास शेतकऱ्यांचे पाचशे कोटींचे नुकसान होते.
शेतकऱ्यावर संकट
ज्वारीचे ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर १२ हजार ५७४ हेक्टर, मूग एक हजार २२३ हेक्टर, इतर पिके चार हजार सहा हेक्टर, बागायती पिकांचे ६१ हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांचे १७७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गृहीत धरल्यास एकूण तीनशे कोटींपर्यंत नुकसान जाते. यामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, भाजीपाला, केळी व चिकू असे एकूण दोन हजार कोटींचा घास अतिवृष्टीने घेतल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे.
शासनाकडे ४३० कोटी ९९ लाखांची मागणी
जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख ८० हजार तीनशे रुपयांची मागणी केली आहे. ही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. परंतु, नुकसानीच्या तुलनेत ही भरपाई खूपच तोकडी आहे. सध्या राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे ता. दहा सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या निकषानुसार तीनपट मदत मिळावी, तसेच पीकविमा कंपनीनेही शेतकऱ्यांना अधिकचा परतावा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.