पर्यटकांच्या संख्येत घट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद- सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याची झळ हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. 

औरंगाबाद- सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याची झळ हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. 

बिबी-का-मकबरा, पाणचक्‍की, अजिंठा-वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशांतून मोठ्या संख्येने पर्यटक शहरात येतात. गेल्या वर्षभरापासून पर्यटकांवर मोठा परिणाम दिसून आला. पर्यटनस्थळी मिळणाऱ्या सुविधा या अपुऱ्या असल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडवली आहे. दोन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये दिवसाकाठी पाच ते सात विदेशी पर्यटक थांबायचे; मात्र गेल्या वर्षभरापासून महिन्याकाठी पाच ते सात विदेशी पर्यटक हॉटेलमध्ये थांबत असल्याने सद्यःस्थितीत विदेश पर्यटक दुर्मिळ झाले आहेत. केवळ बोटावर मोजण्याइतकेच पर्यटक काही थ्रीस्टार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येत आहेत. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत आहे. 

का घटले देशी पर्यटक? 
हॉटेल व्यवसायावर 12, 17 व 28 टक्‍के जीएसटी लावण्यात आला आहे. यासह वाहतुकीचा खर्चही जीएसटीमुळे वाढला आहे. याचा परिणाम देशी पर्यटकांवर प्रत्यक्षरीत्या दिसून येत आहेत. गेल्या दिवाळी व नवरात्रोत्सवानंतर शहरात येणाऱ्या बंगाली आणि गुजराती पर्यटकांनीही शहराकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे हॉटेलचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

का रोडावली विदेशी पर्यटकांची संख्या? 
यावर्षी जानेवारी महिन्यापासून शहरात तीन दंगली झाल्या. त्यामध्ये कोरेगाव भीमा, कचराप्रश्‍न आणि आता मोतीकारंजा, शहागंज भागात झालेल्या दंगलीचा समावेश आहे. याचा मोठा परिणाम विदेशी पर्यटकांच्या संख्येवर पडला. सुरक्षेच्या कारणावरून विदेशी पर्यटक औरंगाबादला टाळत आहेत. शिवाय कचराकोंडीमुळे शहराची देशभर नाचक्की झाली. येथे पर्यटकांना मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. यासह वाढते तापमान हेही पर्यटकांची संख्या कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. 

Web Title: The number of tourists visiting Aurangabad city declined