"आम्हीच असतो दाई अन्‌ आई...'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

रुग्णांसाठी उपचार महत्त्वाचे असतात, त्याहून शुश्रूषा अधिक महत्त्वाची असते. रुग्णांशी सुसंवाद साधला तर त्याला आजाराचा विसर पडू शकतो!

औरंगाबाद - परिचारिका सेवा ही नोकरी किंवा व्यवसाय नाही, तर ते सेवाव्रत आहे. रुग्णसेवा भाव मनात ठेवूनच वाटचाल करतो. अशा सेवेतून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. रुग्ण-नातेवाइकांशी सुसंवाद साधला, की त्यांचे दडपण हलके होते, दूर होते. सेवाभावातून करीअर कधी घडते, हे कळतसुद्धा नाही... सांगताहेत वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांतील परिचारिका.

...आणि तिने माझे पाय धरले!
जयश्री पळशीकर (बीड जिल्हा रुग्णालय, नेत्र विभागाच्या मुख्य परिचारिका) ः प्रसूती वॉर्डामध्ये दाखल झालेल्या मातेजवळ कोणीही नातेवाईक नसतो. एखाद्या बाळंतपणासाठी कधी अर्धा तास, तर कधी दहा तासांपर्यंत वेळ लागतो. संबंधित माता विव्हळत असते. अशा वेळी दाई आणि आई अशी दुहेरी भूमिका परिचारिकांना बजवावी लागते. परिचारिका सेवा हा व्यवसाय, नोकरी नसून; त्याला वेळेत बांधायचे नसते. सेवा समजून काम केले, तर वेगळेच समाधान मिळते. आतापर्यंतच्या 24 वर्षांच्या सेवेतील अनुभवही चांगले आहेत. रुग्ण आणि नातेवाइकांची मानसिक स्थिती समजावून घेतली, तर अडचणी येत नाहीत. बारा वर्षांपूर्वी "आयसीयू'मध्ये सेवेत असताना एका प्राध्यापिकेचे अत्यवस्थ वडील दाखल झाले. डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन नसताना अनुभवाच्या जोरावर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्या वेळी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या प्राध्यापिकेने माझे पाय धरले. अशा काही उदाहरणांवरून या सेवेचे महत्त्व लक्षात येते. रुग्णांसाठी उपचार महत्त्वाचे असतात, त्याहून शुश्रूषा अधिक महत्त्वाची असते. रुग्णांशी सुसंवाद साधला तर त्याला आजाराचा विसर पडू शकतो!

दडपण कमी करण्यात समाधान
एम. डब्लू. देशमुख (मेट्रन, जिल्हा रुग्णालय, हिंगोली) ः परिचारिकेचे काम हे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे दुःख, समस्या समजून घेण्याचे आहे. प्रत्येक रुग्णाची सेवा करण्यात मिळणारे समाधान वेगळेच असते. सेवा या अर्थाने परिचारिका म्हणून करिअर करणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात काम करत असताना संवेदनशीलपणाने रुग्ण व नातेवाइकांचे दडपण कमी करण्याच्या कामास वाहून घेते. त्यातून परिचारिकेचे करिअर, कार्य आपोआप घडते.

प्रत्येकाच्या मनात सेवाभाव
मीनाक्षी ढेंगेकर-भालेराव (निवृत्त परिचारिका, परभणी)
परिचारिका म्हणून काम करताना सेवाभाव जोपासला. रुग्णसेवा हेच ध्येय होते. ही शासकीय नोकरी असतानाही रुग्णसेवेचा वसा कधी टाकला नाही. आजच्या मुलींनीही असाच सेवाभाव अंगीकारावा. माझ्या नोकरीच्या काळातील वातावरण अधिक शिस्तबद्ध होते. सर्व कामे शिस्तीत चालायची. कोणतीही आपत्ती आली, तर सर्वजण न सांगता कामावर हजर राहायचे. हा सेवाभाव प्रत्येकाच्या मनात होता. घर, संसाराबरोबरच रुग्णसेवा हे पहिले कर्तव्य असल्याचे समजत होतो. त्यामुळे नोकरी करताना मजा येत होती. सध्या लोकसंख्या वाढती आहे. आजारांचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नव्याने आलेल्यांवर ताण येणे साहजिक आहे. अशाही स्थितीत त्या मोठ्या धीराने परिस्थितीला सामोरे जात आहेत, ही जमेची बाजू आहे.

"सिस्टर' नाही "मदर'
रंजना दाणे (अधिपरिचारिका, उस्मानाबाद शासकीय रुग्णालय) ः खरे तर आम्हाला सिस्टर संबोधले जाते; पण आम्ही खऱ्या अर्थाने "मदर' असतो. प्रसूती विभागात येणारीचे बाळ पहिला श्‍वास आमच्या हातावर घेते. याशिवाय सुख-दुःखाच्या क्षणी आम्हीच जवळ असतो. रुग्णसेवेत दिवस केव्हा आणि कसा जातो हे कळत नाही. त्यातून मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. सिस्टर असलो, तरी आम्हाला मातेचा दर्जा मिळाला आहे.

Web Title: Nurses share emotions