शेतात केली दगड, गोट्यांची पेरणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शेतामध्ये दगड, गोट्यांची पेरणी करून शासनाच्या या धोरणाचा निषेध केला.

हिंगोली - दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शेतामध्ये दगड, गोट्यांची पेरणी करून शासनाच्या या धोरणाचा निषेध केला.  

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून, अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा पेरणी कशी करावी, असा प्रश्न आहे. कर्जासाठी शेतकरी बॅंकांचे उंबरठे झिजवत असून, त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ बारा हजार शेतकऱ्यांना सुमारे ५७ कोटींचे वाटप झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरालगत एका शेतात दगड, गोट्यांची पेरणी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NYC Activists Agriculture Stone Plantation Loan Drought