नायलॉन मांजा अन्‌ बंदीचा फज्जा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद - न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही शहरात सर्वत्र नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. गल्लोगल्ली पतंग उडविणाऱ्या आणि कापलेल्या पतंगामागे धावणाऱ्यांच्या उच्छादामुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्‍यात आला आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला असून, तत्काळ कारवाई करून मांजाची विक्री थांबविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

संक्रांतीला महिनाच उरला असताना तरुण आणि मुलांमध्ये पतंग उडविण्याची ओढ स्वाभाविकपणे वाढली आहे. गल्लोगल्ली रस्त्यावर पतंग उडविणाऱ्यांमुळे वाहतुकीला होणारे अडथळे नित्याचे असतानाच, मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पशुपक्षी आणि नागरिकांच्या जिवाला या मांजामुळे निर्माण झालेला धोका पाहता न्यायालयाने या चिनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली. मात्र, तरीही शहरात जागोजाग विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पोलिस आणि प्रशासनाने नायलॉन आणि काचेचा चुरा लावलेला मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

२५ जणांचा कापला गळा
गळ्यावर मांजा घासला गेल्याने दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत होते. गेल्या दोन महिन्यांत घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात मांजाने कापलेले सुमारे २५ रुग्ण दाखल झाल्याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले. मांजा गळ्याजवळ आल्यानंतर तोल जाऊन दुचाकीवरून खाली पडलेले, मांजाने गळा कापलेले, नायलॉन मांजाने हात कापलेले अशा प्रकारच्या रुग्णांचा यात समावेश होता. 

बायजीपुरा, राजाबाजार, नई आबादी, बुढीलेन, शहाबाजार परिसरात अशा प्रकारचा मांजा विकला जात असल्याच्या घटना आमच्याही कानावर आल्या आहेत. अनेक विक्रेत्यांवर पूर्वी कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा नायलॉन आणि काचेचा चुरा लावलेला मांजा विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आम्ही देत आहोत. 
-नागनाथ कोडे, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: Nylon Manza is continuously being sold all over the city