बिबी-का-मकबऱ्यात चाललंय काय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : राष्ट्रीय स्मारक असलेल्या जगप्रसिद्ध बिबी-का-मकबऱ्यात शुक्रवारी (ता. चार) दुपारी काही व्यावसायिक छायाचित्रकार आणि मॉडेल्सने आक्षेपार्ह फोटोशूट केले. देशी-विदेशी पर्यटकांसमोर किमान तासभर सुरू असलेल्या या प्रकारावर पर्यटक आणि इतिहासप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद : राष्ट्रीय स्मारक असलेल्या जगप्रसिद्ध बिबी-का-मकबऱ्यात शुक्रवारी (ता. चार) दुपारी काही व्यावसायिक छायाचित्रकार आणि मॉडेल्सने आक्षेपार्ह फोटोशूट केले. देशी-विदेशी पर्यटकांसमोर किमान तासभर सुरू असलेल्या या प्रकारावर पर्यटक आणि इतिहासप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

दख्खनचा ताज म्हणून जगभरात ओळख असलेल्या बिबी-का-मकबरा परिसरात सातत्याने काही ना काही घडत असते. कधी अतिक्रमण, कधी पार्किंगमध्ये लूटमार, कधी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, तर कधी अस्वच्छतेमुळे पर्यटकांना होणारा त्रास...! या साडेतीनशे वर्षे जुन्या वास्तूच्या संवर्धनाच्या नावानेही बोंब आहे. पण जागोजाग सुरक्षारक्षक नेमलेल्या मकबऱ्यात अगदी दर्शनी भागातच तरुण-तरुणींचे आक्षेपार्ह फोटोशूट सुरू होते. 

मकबऱ्यासमोरील कारंज्याच्या हौदात सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. मात्र, ना येथील सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकले, ना अधिकाऱ्यांना याचा पत्ता लागला. त्यावेळी तिथे उपस्थित काही जणांनी याचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केल्यामुळे हा प्रकार समोर आला. आता तरी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संबंधितांवर कारवाई करून या प्रकारांना आळा घालेल का, असा सवाल इतिहासप्रेमी करत आहेत. 

कोणत्याही राष्ट्रीय स्मारकात अशा प्रकारच्या शूटिंगसाठी नियमावली आहे. पण या फोटोशूटमध्ये चाललेला प्रकार नक्कीच अश्‍लील आहे. हे सुरू असताना सुरक्षारक्षक, कर्मचारी काय करीत होते? इथून पुढे असा प्रकार घडू नये, यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने काळजी घेतली पाहिजे. 
- डॉ. दुलारी कुरेशी, इतिहासतज्ज्ञ. 

मकबऱ्यात आज घडलेला हा प्रकार निश्‍चितच वाह्यातपणा आहे. यावेळी सुरक्षारक्षक काय करीत होते? स्मारकाच्या प्रतिष्ठेला यामुळे बाधा येते. संबंधित अधिकाऱ्यांनी हे रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. इथून पुढे तरी ते जागरूक राहतील, अशी अपेक्षा आहे. 
- रफत कुरेशी, इतिहासतज्ज्ञ. 

बिबी-का-मकबऱ्यात झालेला हा प्रकार दुर्दैवी आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी याप्रकारे फोटोशूट करणे चुकीचे आहे. हे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुकवर टाकून लाइक्‍स मिळवण्यासाठी काढले जात असतील, तरी ते अशोभनीय आहे. इथे जगभरातून पर्यटक येतात. त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजेत. पुरातत्त्व विभागाने यावर खबरदारी घ्यावी. 
- आकाश डुमणे, इतिहासप्रेमी. 

असले उथळ प्रकार आणि अंगविक्षेप पाहून पर्यटक काय म्हणत असतील. हे प्रकार रोखता येत नसतील, तर सरकारने किल्ल्यांचे खासगीकरण सुरू केले आहे, तसेच ही भव्य स्मारकेही अशा प्रकारांसाठी खुली करून टाकावीत. इतिहासप्रेमींचा मुद्दा कायमचाच निकाली काढावा. 
- ऋषिकेश पालोदकर, इतिहासप्रेमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Objectionable Photoshoot in Bibi Ka Maqbara