रहाटपाळण्याच्या चाकासोबत अर्थचक्रही थांबले, लातुरात अडकले कामगार

Corona Affects Laborers Lives
Corona Affects Laborers Lives

लातूर ः येथील महाशिवरात्रीची यात्रा होऊन दीड महिना उलटून गेला आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे पुढच्या यात्रा थांबल्या आहेत. रहाटपाळण्याचे चाक थांबले आहे. यासोबतच अर्थचक्रही थांबले गेले आहे. घरापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याने कुटुंबाची चिंताही वाढत आहे. यात्रेनिमित्त रहाटपाळणे, टोरा टोरा, ब्रेक डान्स, ड्रॅगन असे साहित्य घेऊन आलेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशाच्या कामगारांची अशी अवस्था झाली आहे.

यात्रेनिमित्त आलेले हे सर्व कामगार येथेच अडकून पडले आहेत. त्यांचे सर्व साहित्य येथेच पडून आहे. कधी एकदाची टाळेबंदी उठते आणि आपण गावाकडे जाऊ, असे या कामगारांना झाले आहे. एक-एक दिवस त्यांना मोठा वाटू लागला आहे. येथील ग्रामदैवत सिद्धेश्वरांची महाशिवरात्रीची यात्रा ता. २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत पार पडली. या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड अशा राज्यांतून आलेले उंच उंच असलेले रहाटपाळणे, ड्रॅगन, टोरा टोरा, जॉइंट व्हील, डायनासोर अशी विविध खेळण्यांची साधने लहान मुलांचे आकर्षण असते. पहिल्यापासूनच या यात्रेवर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे मोठा प्रतिसाद मिळाला नाही. यात्रा संपली.

यात्रा संपल्यानंतर महाराष्ट्रातील कामगार आपल्या साहित्यासह निघूनही गेले. परराज्यांतील या कामगारांना बुलडाणा येथे होणाऱ्या सैलानीबाबा यात्रेसाठी जायचे होते. त्यामुळे ते येथे थांबले. पण कोरोनामुळे ही यात्राच रद्द झाली. गुलबर्गा येथील एक यात्राही अशीच बंद राहिली. त्यात टाळेबंदी सुरू झाली. त्यामुळे साहित्यासह तीस कामगार येथेच अडकून पडले. पण विविध यात्रांत सहभागी होत शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह यातून होत असतो. लातूरची यात्रा संपली, पुढची यात्रा बंद झाल्याने यांच्या रहाटपाळण्याची चाके थांबली आहेत. त्यांचे अर्थचक्रच थांबले आहे. पावसाळ्यात यात्रा होत नाहीत. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही आता या कामगारांसमोर आहे. सध्या येथे सिद्धेश्वर मंदिराच्या वतीने या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले जात आहे. त्याचाच स्वयंपाक करून हे कामगार पोट भरत आहेत.


महाशिवरात्री यात्रेसाठी दोन महिन्यांपूर्वी आम्ही आलो. यात्रा होऊन दीड महिना झाला आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आम्ही अडकून पडलो आहोत. पुढच्या सर्व यात्रा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे आमच्या हाताला काम नाही. कुटुंबीय गावाकडे आहेत. त्यांच्याही मनात कोरोनाची भीती आहे. काळजी वाटत आहे. टाळेबंदी उठल्यानंतर गाव जवळ करणार आहोत.
- आमलेकुमार राव, ओडिशा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com