आमदार सुरेश धस, भीमराव धोंडेंसह गोल्हार दांपत्यावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

विनापरवाना मोर्चा काढून जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका 
 

आष्टी (बीड) - आचारसंहिता काळात विनापरवाना मूक मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस, आमदार तथा भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, त्यांचे पती विजय गोल्हार तसेच इतर चार-पाचजणांवर आष्टी पोलिसांत रविवारी (ता. 20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परळीतील उमेदवार धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेतील भाषणात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप असणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या वक्तव्याचा निषेध म्हणून आज (रविवार) आमदार धोंडे, धस, गोल्हार दांपत्य यांच्या नेतृत्वाखाली आष्टी येथे मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले. किनारा चौकातून मोर्चा निघून तहसील कार्यालयात निवडणूक विभागाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर धस यांच्या निवासस्थानाच्या आवारात सभा घेऊन धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

 दरम्यान, आचारसंहिता काळात विनापरवाना मोर्चा काढून जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा निवडणूक शाखेच्या पथकाच्या (एफएससी) अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार धस, धोंडे, गोल्हार दांपत्य यांच्यासह इतर चार-पाचजणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offense for violation of mob order