सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ अन्‌ कॉमेंट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

निवडणुका संपल्यानंतर शहरात शांतता व कायदा व सुव्यवस्थेला बाधक कृत्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. तणावाला चालना देणारे आक्षेपार्ह व्हिडिओ, समाजात तेढ होईल असे व्हिडिओ व्हायरल करणे, पोस्टवर कमेंट केल्याच्या तीन प्रकरणांत उस्मानपुरा, जिन्सी व सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २७) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

औरंगाबाद - निवडणुका संपल्यानंतर शहरात शांतता व कायदा व सुव्यवस्थेला बाधक कृत्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. तणावाला चालना देणारे आक्षेपार्ह व्हिडिओ, समाजात तेढ होईल असे व्हिडिओ व्हायरल करणे, पोस्टवर कमेंट केल्याच्या तीन प्रकरणांत उस्मानपुरा, जिन्सी व सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २७) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशा वक्तव्याची व्हिडिओ क्‍लिप, मजकूर व्हायरल केला जात होता. त्यावर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई केली. त्यानंतर फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि सोशल मीडियावर क्‍लिप्स फिरवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचविण्याचे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह असणाऱ्या चिथावणीखोरांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हे शाखा, सायबर सेल सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट तपासत आहेत. यात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या क्‍लिप्स, पोस्ट आढळून आल्यास थेट गुन्हे नोंदवायला सुरवात केली आहे. फेसबुक पोस्टवर आलेल्या कमेंटवरून एक गुन्हा उस्मानपुरा ठाण्यात; तसेच जिन्सी व सिडको ठाण्यात व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

  टेक्‍निकल ॲनालिसिस करून व्हिडिओ तयार करणारे; तसेच व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. 
  तांत्रिक पुरावे सहज मिळत असल्याने अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.
  यापूर्वी गुन्हे शाखेने दोन प्रकरणांत गुन्हे नोंद करून संशयितांना बेड्याही ठोकल्या.

जातीय तेढ, तणाव निर्माण करणाऱ्यांची गय करणार नाही. सोशल मीडियावर धार्मिक तेढ होईल असे कृत्य करणारे व्हिडिओ, पोस्ट करू नका. त्यावर कमेंटही करू नका. व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्येही आक्षेपार्ह चॅटिंग करणे टाळा अन्यथा गुन्हा नोंद होईल व कडक कारवाई केली जाईल. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offensive video and comments on social media