हिंगोली : अधिकारी प्रशांत खेडेकर यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

येथील तडीपार स्‍पेशालिस्‍ट उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना मुंबईच्‍या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.

हिंगोली : येथील तडीपार स्‍पेशालिस्‍ट उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना मुंबईच्‍या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.

कळमनुरी उपविभागामध्ये कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी महसूल प्रशासनाचा चांगलाच वचक दाखवून दिला आहे. पोलिस प्रशासनाकडून तडीपाराच्‍या आलेल्‍या प्रस्‍तावावर तातडीने निर्णय घेवून खेडेकर यांनी सुमारे वीसपेक्षा अधिक जणांना तडीपार केले आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींना फटका बसला आहे.

याशिवाय कर्तव्यदक्ष अधिकारी म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. हिंगोली शहरातील रामलिला मैदानावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत त्‍यांनी हात घालून ही मोहिम यशस्‍वीपणे राबवली. त्‍यामुळे मागील वर्षानुवर्ष अतिक्रमणाच्‍या विळख्यात सापडलेल्‍या रामलिला मैदानाने मोकळा श्वास घेतला आहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग व रेल्‍वे मार्गाच्‍या भूसंपादनाचे प्रस्‍ताव तातडीने निकाली काढून संपादित जमिनी राष्ट्रीय महामार्गाकडे हस्‍तांतरीत केल्‍या आहेत. त्‍यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खेडेकर यांच्‍या कार्याची दखल घेत मुंबईच्‍या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे. ता. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात या पुरस्‍काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू जेष्ठ गांधी अभ्यासक तुषार गांधी, माजी शिक्षणमंत्री तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्राचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्‍या उपस्‍थितीत पुरस्‍कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्‍यांच्‍या निवडीबद्दल त्‍यांचे अभिनंदन केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officer Prashant Khedekar is honored