नांदेड : लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यास अटक 

प्रल्हाद कांबळे 
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्यात गेलेल्या शेतीचा मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी ५० हजाराची लाच घेणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

नांदेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्या गेलेल्या शेतीचा मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी ५० हजाराची लाच घेणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई गुरूवारी (ता. 5) दुपारी त्याच्याच कार्यालयात केली. 

मुदखेड तालुक्यातील एका तक्रारकर्त्या शेतकऱ्याच्या भाऊ आणि वहिनी यांच्या नावे असलेल्या शेतातून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा कालवा गेला होता. सदरची शेत जमीन भूसंपादन करून पिडीत शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उपविभाग क्रमांक १९ मध्ये तक्रारदराने कागदपत्र दाखल केले. भूसंपादनाच्या मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे उपविभागीय अधिकारी नारायण यशवंत राऊत यांनी ५० हजाराची लाच मागितली. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ता. ३१) आॅगस्ट रोजी तक्रार दिली.

दरम्यान, यावरून एसीबीच्या पथकाने पडताळणी सापळा लावला. यात राऊत यांनी ५० हजार रुपये मागितल्याचे सिद्ध झाले. त्यावरून त्याच्याच कार्यालय परिसरात गुरूवारी  दुपारी सापळा लावला. तक्रारदाराकडून ५० हजाराची लाच घेताना लाचखोर उविभागीय अधिकीर राऊत रंगेहात जाळ्यात अडकला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक भूजंग गोडबोले यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भुजंग गोडबोले, कर्मचारी एकनाथ गंगातिर्थ, गणेश केजगर, दर्शन यादव, अंकुश गाडेकर, शेख मजीब यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers arrested for taking bribe in nanded