मुंबईच्या अधिकाऱ्यांना नको औरंगाबादला बदली

प्रकाश बनकर
सोमवार, 22 जुलै 2019

- इतर शहरांपेक्षा मुंबईत सर्व सुविधा मिळतात. परिणामी, मुंबईमध्ये शासकीय नोकरीत असलेले अनेक अधिकारी इतरत्र जाण्यास तयार नसतात.

- औरंगाबादच्या राज्यकर जीएसटीचे सहायुक्‍तपद आणि राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्‍साईज) विभागीय कार्यालयाचे उपायुक्‍तपद अशा दोन्ही ठिकाणी मुंबईतील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली.

- पण या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद नको असल्याचे सांगत बदली झालेल्या ठिकाणचा पदभार स्वीकारला नाही. यामुळे या दोन्ही विभागांचे प्रमुख पद प्रभारींकडे आहे.

औरंगाबाद : इतर शहरांपेक्षा मुंबईत सर्व सुविधा मिळतात. परिणामी, मुंबईमध्ये शासकीय नोकरीत असलेले अनेक अधिकारी इतरत्र जाण्यास तयार नसतात. औरंगाबादच्या राज्यकर जीएसटीचे सहायुक्‍तपद आणि राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्‍साईज) विभागीय कार्यालयाचे उपायुक्‍तपद अशा दोन्ही ठिकाणी मुंबईतील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली. पण या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद नको असल्याचे सांगत बदली झालेल्या ठिकाणचा पदभार स्वीकारला नाही. यामुळे या दोन्ही विभागांचे प्रमुख पद प्रभारींकडे आहे.

जीएसटी आणि स्टेट एक्‍साईज हे विभाग राज्य शासनाच्या महसुलात महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्ही विभागांतील पूर्वीच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्याने बदल्या झाल्या. राज्यकर जीएसटी कार्यालयाच्या राज्यकर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची चार डिसेंबर 2018 ला उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली; तेव्हापासून आतापर्यंत नाशिक येथील डॉ. विकास डोके यांच्याकडे पदभार आहे.

मध्यंतरी या पदावर मुंबईचे एस. एम. लोखंडे यांची बदली झाली होती. ते एक एप्रिलला राज्यकर सहआयुक्‍त पदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र जुलै संपत आला तरीही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. यामुळे डॉ. डोके यांना नाशिक आणि औरंगाबाद अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. यात त्यांचा मोठा वेळ खर्च होत आहे. लोखंडे यांनी पदभार स्वीकारला नाही. 

एक्‍साईजच्या उपायुक्‍तांचाही ना-ना? 
राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयाचा (एक्‍साईज) उपायुक्‍तांचाही प्रभार पाच महिन्यांपासून पुणे येथील अर्जुन ओव्हळ यांच्याकडे देण्यात आला आहे. या पदावर जुलैच्या पहिल्या महिन्यात मुंबई येथील औषध आणि सौंदर्य विभागाचे उपायुक्‍त असलेले पी. एच. पवार यांची बदली झाली आहे.

त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अद्यापही हा पदभार ओव्हळ यांच्याकडेच आहे. पवार हे आठ जुलैपर्यंत पदभार स्वीकारणार होते; मात्र त्यांनी अद्यापही पद स्वीकारले नाही. त्यांची येण्याची इच्छा नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 
दोन्ही विभागांचे काम अतिरिक्‍त अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे दोन्ही कार्यालयाची कामे संथ सुरू आहेत. दोन्ही विभागाच्या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणीही केली जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers say no to their transfer