तलाठ्य़ाला लाच घेताना पकडले रंगेहाथ!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

- वसमत तालुक्‍यातील कुरुंदवाडी येथील एका शेतकऱ्याच्‍या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करायचा होता.

- यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास गिरगाव चौफुली येथे गुरुवारी (ता.२५) लाच लुचपतच्‍या पथकाने रंगेहाथ पकडले.

हिंगाेली : वसमत तालुक्‍यातील कुरुंदवाडी येथील एका शेतकऱ्याच्‍या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास गिरगाव चौफुली येथे गुरुवारी (ता. 25) लाच लुचपतच्‍या पथकाने रंगेहाथ पकडले.

वसमत तालुक्‍यातील कुरुंदवाडी सज्‍जाचे तलाठी संजय धाडवे याच्‍याकडे गिरगाव तलाठी सज्‍जाचा अतिरिक्‍त पदभार आहे. त्‍यामुळे ते दोन्‍ही ठिकाणी काम पाहतात. कुरुंदवाडी येथील एका शेतकऱ्याने सातबारावरील बँकेचा कर्जाचा बोजा कमी करावा, तसेच शेतात लावलेल्‍या संत्र्याच्‍या झाडांची नोंद सातबारावर घ्यावी अशी मागणी तलाठी धाडवे यांच्‍याकडे केली होती. मात्र यासाठी दोन हजार रुपयांची लाच त्‍याने मागितली. सदर रक्‍कम आज गिरगाव येथे देण्याचे ठरले होते. 

या प्रकरणात संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्‍या लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यावरून लाच लुचपतचे अधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जमादार अभिमन्यू कांदे, विजय उपरे, संतोष दुमाने, रुद्रा कबाडे, विनोद देशमुख, अनिल किर्तनकार, ज्ञानेश्वर पंचलिंगे यांच्‍या पथकाने गिरगाव येथे सापळा रचला. मात्र गिरगाव चौफुलीवर तलाठी धाडवे व संबंधित शेतकऱ्याची भेट झाली. यावेळी त्‍याने दोन हजार रुपयांची लाच घेतली. सदर रक्‍कम स्‍विकारताच लाच लुचपतच्‍या पथकाने तलाठी धाडवे यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Official caught red hand while taking bribe