पुलांच्या ऑडिटसाठी 'सीओईपी'कडे डोळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

'महापालिकेला सीओईपी महाविद्यालयाच्या वतीने या पुलांची माहिती मागण्यात आली होती. त्याची पूर्तता आम्ही केली आहे. आम्हीसुद्धा त्यांची वाट पाहत आहोत. या तज्ज्ञांनी कधीही यावे आणि या पुलांवरील काम सुरू करावे.'' - हेमंत कोल्हे (शहर अभियंता, महापालिका)

औरंगाबाद - औरंगाबादमधील ऐतिहासिक पुलांचे सेफ्टी आणि स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी दोन महिन्यांनंतरही झालेली नाही. माहिती पाठवल्यानंतर आता महापालिकेचे डोळे सीओईपी महाविद्यालयातून येणाऱ्या पथकाकडे लागले आहेत.

खाम नदीवरील पुलांनी आयुष्याची तीनशे वर्षे ओलांडली असली तरी त्यांच्यावरून होणाऱ्या रहदारीला कोणताही लगाम लागलेला नाही. सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यावर "सकाळ'ने शहरातील खाम नदीवरील ऐतिहासिक पुलांच्या दुरवस्थेला वाचा फोडली होती. त्यानंतर महापालिकेने या पुलांचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला होता. या आदेशाला दोन महिने ओलांडले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

'तारीख पे तारीख' हा सिलसिला सुरूच असून, आता आगामी आठवड्याभरात हे पथक औरंगाबादेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर शहरात असे ऑडिट करणारे नसल्याने हे कंत्राट पुण्याच्या सीओईपी महाविद्यालयाला दिले आहे. सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता या पथकाची वाट महापालिका प्रशासन बघत बसले आहे. दिवाळीनंतर हे पथक ऑडिटसाठी येणार असल्याने शहरातील पुलांचे सर्वेक्षण आणि त्यांच्या परिस्थितीचा लेखाजोखा शासन दरबारी जाणार असल्याने हा विषय खाम नदीवरील हे पूल ओलांडणाऱ्या लाखो लोकांसाठी महत्त्वाचा आहे.

तातडीने म्हणजे किती काळ?
सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून विभागीय आयुक्तांनी शहरातील ऐतिहासिक पुलांचे तातडीने ऑडिट करण्याचा आदेश दिला होता. तातडीने म्हणजे नेमके किती दिवस याला कोणतीही सीमा नाही. या कामासाठी दोन महिने येथे कोणीही आलेले नाही. या पुलांची दुरवस्था आणि नागरिकांची त्यावरील असलेली निर्भरता लक्षात घेता हे ऑडिट त्वरित व्हायला हवे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: old bridge audit by ceo