जुन्या नोटा बदलण्याचा डाव उधळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

उदगीर - उदगीरमधील राजेश्वरी लॉजमध्ये जुन्या नोटा बदलून देणारी टोळी दाखल झाली, याची कुणकुण लागताच एका नागरिकाने शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी सोमवारी (ता. 16) सायंकाळी लॉजवर छापा घातला. या छाप्यामुळे नोटा बदलण्याचा डाव उधळला गेला; मात्र या रकमेचा तपास करण्यात पोलिसांना यश आले नाही.

पोलिस उपअधीक्षक अनिकेत भारती व शहर पोलिस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. पोलिसांनी लॉजवर छापा घातला. तेथे सुशील बुद्धदेव, मयूर बोहरा, चेतन गंगवाल (सर्व रा. औरंगाबाद), कल्पेश चंदे (रा. बार्शी), आमेर शेख, सिकंदर खतीब सुरेश बुद्धदेव (सर्व रा. बीड) या संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ आधारकार्ड व एकूण अकरा हजार पाचशे पन्नास रुपये आढळले. त्यांनी जबाबात सांगितले, की लातूरचा संतोष कांबळे हा चलनी नोटा आणणार होता. मोतीपवळे व गायकवाड हे जुन्या हजार, पाचशेच्या नोटा आणणार होते; परंतु ते आले नाहीत. आम्ही फक्त दोन्ही पार्टींना जुन्या नोटा बदलून देण्यासाठी मध्यस्थी करणार होतो. त्यात एक टक्का रक्कम आम्हाला कमिशन मिळणार होते. कांबळे याच्या शोधासाठी लातूरला पथक पाठविले असता, तो घरी आढळला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल करणार नाही
पैसे बदलण्याच्या उद्देशाने आलेल्या रॅकेटमधील संशयितांचा तपास सुरू असून त्यांच्याकडे जुन्या नोटा सापडल्या नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती यांनी दिली.

Web Title: old currency changes planning fail