पंच्याहत्तर वर्षांचे आजोबा करतात आजही 'हे' काम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

गेल्या 45 वर्षांपासून सायकलवर वृत्तपत्रे वाटतो. सकाळी लवकर उठणे आणि सायकलवरील रपेट यामुळे आजपर्यंत कधी दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आल्याचे मला आठवत नाही,'' असे श्री. कांबळे सांगतात.

औरंगाबाद : पदवीच्या शिक्षणासाठी शहरात आलेले साहेबराव कांबळे यांनी उद्यमी स्वभावानुसार 1972 मध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज वयाच्या 75व्या वर्षीही ते अलार्म न लावता पहाटे साडेतीनला उठतात. 90 घरी फिरून 180 वृत्तपत्रे वाटतात. लाखो रुपये भरून न मिळणारे निरोगी आयुष्य यानिमित्ताने सायकलवर फिरल्यामुळे मिळवल्याचे सांगत, हातपाय चालतील तोपर्यंत वृत्तपत्र विक्री करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील काळगाव इथले साहेबराव उमाजी कांबळे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत आले. मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन पदवीची दोन वर्षं शिक्षण घेतले. पण पुढे व्यवसायच करण्याचे ठरवून 1972 मध्ये वृत्तपत्र विक्रेत्याकडे कामाला सुरवात केली. व्यवसायाचे गणित समजून घेतल्यानंतर त्यांनी स्वतःची एजन्सी सुरू केली. सुरवातीला 60 ग्राहक मिळाले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. पैसे जमवून स्वतःचे घर बांधले. मुलांची लग्ने लावून दिली. त्यामुळे आज समाधानी असल्याचे ते सांगतात.

निरोगी राहण्याचा मंत्र 

गेल्या 45 वर्षांपासून सायकलवर वृत्तपत्रे वाटतो. सकाळी लवकर उठणे आणि सायकलवरील रपेट यामुळे आजपर्यंत कधी दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आल्याचे मला आठवत नाही,'' असे श्री. कांबळे सांगतात. वृत्तपत्र वितरणासारखा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही. यात फक्त चिकाटी, जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा हवी. हे असल्यास निरोगी आणि सुखी आयुष्य जगण्यात कुठलीच अडचण येत नाही, अशी त्यांची भावना आहे. 

सायकलही गेली चोरीला 

गणपतीच्या काळात गल्लीत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी साहेबराव कांबळे यांची सायकल लंपास केली. त्यामुळे सध्या ते पायी फिरून वृत्तपत्रे वाटतात. गेली 45 वर्षे साथ देणारी सायकल चोरीला गेल्यामुळे सतत काहीतरी हरवल्याची रुखरुख लागून राहिल्याचे कांबळे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man in newspaper selling