'घाटी'त लवकरच वृध्दांसाठी स्वतंत्र वॉर्ड

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवजात शिशू, हृदयरोग वॉर्डाचेही लागले वेध, तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार

औरंगाबाद - दिवसेंदिवस आजारांची वाढती संख्या, त्याचा वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वृद्ध रुग्णांवर स्वतंत्र उपचार करता यावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन वॉर्ड सुरू करण्याबरोबरच अन्य दोन वॉर्ड सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील, असे संकेत मिळत आहेत. याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे.

मराठवाड्यासह खानदेश परिसरातील रुग्णांना आवश्‍यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. "घाटी'त सध्या वेगवेगळे 30 विभाग असून, नव्या तीन विभागांची भर पडेल. यामध्ये नवजात शिशू, हृदयरोग आणि वृद्धांचे आजार (जिरिऍट्रिक) अशा वॉर्डांचा समावेश राहील. प्रत्येक वॉर्डात 30 खाटा राहणार आहेत. त्यासाठी तिन्ही विषयांचे सुपर स्पेशालिटीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील. विशेष म्हणजे नवजात शिशूंसाठी प्राथमिक मान्यतेचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित दोन विभागांसाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठलाही नवीन विभाग सुरू करायचा असेल तर, त्यासाठी आवश्‍यक सुविधा, इमारतीची पूर्तता करून प्रस्ताव अहवाल सादर करावा लागतो. तसे प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर करण्यात आलेले आहेत. कुठल्याही क्षणी त्यांचे पथक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यास येऊ शकते. या पथकाने भेट देऊन हिरवा कंदील दाखविल्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) या सर्व गोष्टींची पाहणी करून परवानगी देईल. या अभ्यासक्रमांसाठीची तयारी करण्यात आली आहे.

वृद्धांच्या आजारपणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे सर्वत्र दिसून येते. त्यांचे आजार हे वेगळे असल्यामुळे त्यासाठीचे उपचार करणारे डॉक्‍टरही स्वतंत्र असायलाच हवेत. या सर्व गोष्टींची पूर्तता करणारा हा विभाग राज्यातील एकमेव असेल. या वॉर्डात 30 खाटा असतील. या माध्यमातून प्रत्येक आजाराचे निदान करणे सोपे होणार आहे. तसेच वृद्धांना दीर्घायुष्य मिळवून देण्यासाठी हे सकारात्मक पाऊल असेल.
- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय.

नवीन अभ्यासक्रमांचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या भागातील रुग्णांनाही चांगला फायदा होईल. सुपरस्पेशालिटीच्या सुविधा सध्या गोरगरिबांच्या आवाक्‍याबाहेर जात असताना, शासकीय रुग्णालयात या सुविधा उपलब्ध झाल्यास मोठा दिलासा मिळेल.
- मुकुंद फुलारी, सदस्य, अभ्यागत समिती.

Web Title: old people independent ward in ghati hospital