ज्येष्ठांना समाजाच्या आधाराची अपेक्षा

योगेश पायघन
शुक्रवार, 15 जून 2018

औरंगाबाद - स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात जेथे लोकांकडे स्वतःच्या मुलांकडे लक्ष देण्यास फुरसत नाही, तेथे घरातील ज्येष्ठांसाठी वेळ देणारे तसे दुर्मीळच. जागेची कमतरता आणि आर्थिक विवंचना यांमुळे उतारवयात एकाकीपणा आणि दुलर्क्षितपणाची भावना ज्येष्ठांसाठी मोठी समस्या ठरत आहे. सरकारने या समस्यांचे गांभीर्य ओळखून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्रवास सवलती, वैद्यकीय भत्ता, निवृत्तीचे वय इत्यादींविषयी उपाययोजना करण्याची गरज शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्थांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही विरंगुळा केंद्र नसल्याचे प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश पंडितराव दुसे यांनी सांगितले. "सिडको येथील गीता भवनच्या टेरेसवर विरंगुळा केंद्र तयार करण्याची आम्ही मागणी करीत आहोत. मात्र, महापालिका, महापौर, आयुक्त आणि अन्य कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. स्मार्ट सिटीच्या योजनेमध्येही ज्येष्ठ नागरिकांना स्थान नाही. शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्थांची दहा वर्षांपासून जागेची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही,' असे ते म्हणाले. समाजाने पुढाकार घेऊन एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यांना मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांना माहिती देण्याचे त्यांनी आवाहन केले.

सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक, औरंगाबाद ज्येष्ठ नागरिक संस्था, महिला ज्येष्ठ नागरिक संस्था अशा काही संस्था कार्यरत आहेत. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनाही आहेत. या सर्वांचे प्रश्‍न एकत्रितपणे सोडविण्यासाठी सरकार दरबारी उपाययोजना झाल्या, तर उतारवयातील आयुष्य काहीसे सुखकर होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठांना दैनंदिन जीवनात समाजाकडून सन्मान, प्राधान्य, मदतीची अपेक्षा असते. त्यांच्यासाठी प्रवास सवलती वयाच्या 65 ऐवजी साठाव्या वर्षांपासून असाव्यात. निवृत्तीनंतरही वैद्यकीय भत्ता मिळावा, महागाई भत्त्यातील तफावत दूर करावी, असे त्यांनी सांगितले.

- दिवस घालविण्यासाठी विरंगुळा केंद्रांची गरज
- ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांना बळकटीचे सरकारकडून प्रयत्न नाहीत
- स्मार्ट सिटीत ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य हवे
- समाजाने एकट्या जोडप्यांकडे लक्ष देण्याची गरज
- निवृत्तीचे वय 60 करण्याची मागणी
- प्रवास सवलत वयाच्या साठाव्या वर्षांपासून असावी

Web Title: old people society support