आजीबाईंनी आयुक्‍तांच्या दालनासमोर घातला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

औरंगाबाद - अंगुरीबाग फकीरवाडी येथील एका गल्लीतील बेकायदा बांधकामामुळे त्रस्त असलेल्या वृद्ध महिलेने महापालिका आयुक्‍तांच्या दालनासमोर ठिय्या दिला. त्यानंतर आक्रोश करीत बांगड्या फोडून घेतल्या, डोके जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आयुक्तांच्या दालनासमोर काही काळ तणाव निर्माण झाला.

औरंगाबाद - अंगुरीबाग फकीरवाडी येथील एका गल्लीतील बेकायदा बांधकामामुळे त्रस्त असलेल्या वृद्ध महिलेने महापालिका आयुक्‍तांच्या दालनासमोर ठिय्या दिला. त्यानंतर आक्रोश करीत बांगड्या फोडून घेतल्या, डोके जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आयुक्तांच्या दालनासमोर काही काळ तणाव निर्माण झाला.

आयुक्तांनी दखल घेत दुपारपर्यंत बेकायदा बांधकाम काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरही त्यांनी आयुक्‍त कार्यालयाबाहेर दुपारपर्यंत ठाण मांडले होते.

फकीरवाडी अंगुरीबाग येथील सीट नंबर 74 मध्ये वृद्ध लीलाबाई पगारे यांचे घर आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर पगारे यांच्या जागेसमोरील सार्वजनिक वापराच्या गल्लीत अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामामुळे आपणास व परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे ते पाडण्यात यावे, या मागणीसाठी लीलाबाई पगारे व मोहिनी कुंटनवार या दोन महिलांनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्या वेळी त्यांना बेकायदा बांधकाम पाडण्याचे आश्‍वासन दिल्याने त्यांनी उपोषण सोडले.

त्याप्रमाणे मार्च महिन्यात महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक ते बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेले होते. जेसीबीसह पथक तिथे दाखल झाले असता, या पथकाला पाहताच अतिक्रमण करणाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली. यामुळे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेलेले पथक कारवाई न करता लगेच परत फिरले.

त्यानंतर मंगळवारी (ता. दोन) हे बेकायदा बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र पथक सकाळी आले नाही, म्हणून लीलाबाई पगारे या सकाळी दहा वाजता महापालिकेत दाखल झाल्या. त्यांनी थेट महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांचे दालन गाठले. तिथे जाऊन त्यांनी आरडाओरड सुरू केली, बेकायदा बांधकाम पाडले नाही तर मी इथेच जीव देईन म्हणत डोके आपटून घेणे सुरू केले. सुरक्षा रक्षकांनी, महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आयुक्‍त श्री. मुगळीकर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन दुपारपर्यंत बेकायदा बांधकाम पाडण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार प्रशासकीय विभागाला तत्काळ आदेश दिले; मात्र लीलाबाई यांनी जोपर्यंत बेकायदा बांधकाम पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही म्हणत आयुक्‍त कार्यालयाच्या बाहेरच ठाण मांडले होते.

लीलाबाई यांनी दिलेल्या निवेदनात बाळासाहेब दादा पाटील वाघ यांनी सार्वजनिक गल्लीत बेकायदा बांधकाम केले असून, उपायुक्‍त रवींद्र निकम व प्रशासकीय अधिकारी एम. एम. खान यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत; मात्र चिरीमिरी घेऊन बेकायदा बांधकामाला ते मदत करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आयुक्‍तांच्या दालनापुढेच बसून राहिल्या. आयुक्‍तांनी सायंकाळी पुन्हा त्यांना बोलावून घेतले आणि त्यांना दिलासा दिला. रवींद्र निकम यांना बोलावून अतिक्रमण काढण्यासाठी पाठवून लीलाबाई पगारे यांना घरी जाण्यास सांगितले. यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण हटाव पथक गेले; मात्र कारवाई न करताच परत आले.

Web Title: old women confronted before the Commissioner's door