लातूर, कर्नाटकातून मोटारसायकल चोरणाऱ्या एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

लातूर जिल्ह्यासह कर्नाटकात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका चोराला उदगीर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख 85 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. 

लातूरः लातूर जिल्ह्यासह कर्नाटकात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका चोराला उदगीर (जि. लातूर) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख 85 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. 
उदगीर येथे ता. सात व आठ ऑगस्ट रोजी पस्तापुरे कॉलनी, जय जवान हॉटेल, मकबुल बावडी येथून मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा तपास करण्याचे पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष नागरगोजे यांना सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार श्री. नागरगोजे यांनी उपनिरीक्षक कोमवाड, संजय भोसले, तरडे, खुर्रम काझी, बंटी गायकवाड, रियाज सौदागर, भिष्मानंद साखरे, गोविंद जाधव यांचे पथक या घटना उघडकीस आणण्यासाठी नियुक्त केले होते. हे पथक गेल्या काही दिवसांपासून उदगीर येथे तळ ठोकून होते.

या घटनांचा तपास करीत असताना किशोर सखाराम कांबळे आणि बालाजी बाबूराव श्रीमंगले (रा. बनशेळगी रोड) यांनी उदगीर व बिदर येथील मोटारसायकली चोरल्या आहेत. त्याची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत, अशी माहिती पोलिसंना मिळाली. त्यानंतर या पथकाने छापा मारून किशोर कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या तटभिंतीजवळ वेगवेगळ्या कंपन्यांच्या चोरलेल्या मोटारसायकली पोलिसांना सापडल्या.

नंबर प्लेट नसलेल्या या आठ मोटारसायकली होत्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने श्रीमंगले या साथीदारासोबत मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी या दोन लाख 85 हजारांच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या. बालाजी श्रीमंगले हा सध्या बिदर पोलिस ठाण्यात अटकेत आहे.

त्याच्याकडून बिदर पोलिसांनी उदगीर व बिदरमध्ये चोरलेल्या वीस मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या चोरांकडून आणखी मोटारसायकली मिळण्याची शक्‍यता असून तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for stealing motorcycles from Latur, Karnataka