पैठण ः तीर्थखांब संवर्धन, सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये

चंद्रकांत तारू
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पैठण या ऐतिहासिक नगरीतील 12 व्या शतकातील यादवकालीन प्राचीन तीर्थखांबाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या विकासकामाला पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राधिकरण विकास समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, सहअध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण या ऐतिहासिक नगरीतील 12 व्या शतकातील यादवकालीन प्राचीन तीर्थखांबाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या विकासकामाला पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राधिकरण विकास समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, सहअध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे.

त्यानुसार तीर्थखांब परिसरातील सुशोभीकरणाची विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. शहरातील पालथीनगरी परिसरात हा तीर्थखांब प्राचीन काळापासून उभा आहे. शतकानुशतके हा खांब उभा असून पुरातन दगडी खांबाची ही निर्मिती आहे. केंद्रीय व राज्य पुरातत्त्व खात्याच्या अधिकारक्षेत्रातील हा तीर्थखांब अलीकडच्या काळात पुरातत्त्व खात्याने विशेष लक्ष न दिल्यामुळे जीर्ण होत चालला आहे.

परिणामी या पैठणनगरीचे प्रतीक असणारा हा तीर्थखांब अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर गेला आहे; परंतु आता विकास प्राधिकरणातून एक कोटीचा निधी यासाठी मिळाल्याने तीर्थखांब उजळून निघणार आहे. दगड निर्मितीच्या या तीर्थखांबावर रासायनिक प्रक्रिया करून लेप दिला जाणार आहे. यामुळे खांबाला झळाळी निर्माण होईल; तसेच या परिसरात सात फूट उंचीचे दगड भिंतींचे संरक्षण, आतील बाजूला काळ्या दगडातील फरशी, गार्डन, नागरिक व इतिहासप्रेमींसाठी स्टोन बॅंचेस, प्रवेशद्वार, विद्युत व्यवस्था, तीर्थखांबावरील विद्युत रंगबेरंगी रोषणाई, पाणीव्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे आदी कामे करण्यात येणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Crore For Thirth Khamb Development