एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

"मै भी नायक, एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत' असा उपक्रम औरंगाबाद शहर युवक कॉंग्रेसच्यावतीने राबवण्यात येणार आहे. यासाठी रविवारी (ता. आठ) येथे युवकांची पात्रता फेरी घेण्यात आली

औरंगाबाद  : राज्याचे कामकाज सांभाळणे सोप्पे काम नाही. ते करताना मुख्यमंत्र्यांना दिवसभरात किती कामे करावी लागतात, कशी करावी लागतात याची सर्वसामान्यांना कल्पना नसते. यामुळे मुख्यमंत्र्यांना कसे कामकाज करावे लागते याची माहिती त्यांच्यासोबत एक दिवस राहून घेता यावी, यासाठी "मै भी नायक, एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत' असा उपक्रम औरंगाबाद शहर युवक कॉंग्रेसच्यावतीने राबवण्यात येणार आहे. यासाठी रविवारी (ता. आठ) येथे युवकांची पात्रता फेरी घेण्यात आली; मात्र यातुन निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकांना महाराष्ट्राच्या नव्हे तर ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी मिळणार आहे. 

औरंगाबाद शहर युवक कॉंगेस वतीने औरंगाबाद, जालना व बुलडाणा जिल्ह्यासाठी रविवारी हर्सूल येथील उर्दू स्कूलमध्ये पात्रता फेरी घेण्यात आली. 
एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी "तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र' या विषयावर तीन मिनिटांचे भाषण, एकपात्री अभिनयाच्या स्वरुपात तयार करून वेकअप महाराष्ट्र या हॅशटॅगसह फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, तसेच युवक कॉंग्रेसने दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हिडिओ अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शंभर स्पर्धकांनी नोंदणी केली होती.

छाननीअंती 50 जणांची रविवारी जिल्हास्तरीय पात्रता फेरी झाली. त्यातून सात पात्र स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये ऐश्वर्या कोठारी, अनुश्री हिरादेव, ऍड. सूरज सानप, कुमार कोठारी, किरण काकडे, सलीम चांद कुरेशी, नदीम पटेल यांचा समावेश आहे. डॉ. जफर अहेमदखान, डॉ. वीरा राठोड परिक्षक म्हणून होते. त्यांच्या हस्ते टिकीट टू विधानसभा पात्र विजेता घोषित करण्यात आले. या पात्र स्पर्धकांची मुंबई येथे अंतिम फेरीसाठी ऑडिशन घेतली झाणार आहे. अंतिम फेरीत निवडल्या जाणाऱ्या 10 स्पर्धकांना पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश व पॉण्डीचरी या कॉंग्रेसचे सरकार असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस राहून कामकाज पाहण्याची संधी मिळणार असल्याचे जितेंद्र देहाडे यांनी सांगितले. येथील स्पर्धेचे आयोजन शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फरखान पठाण यांनी केले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one day with chief minister