esakal | एकीकडे पावसाची रिपरिप, दुसरीकडे सोयाबीनवर कीड तर अन्यत्र जनावरांना लंपी स्क्रीन आजार   
sakal

बोलून बातमी शोधा

soyabeen

जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण पहावयास मिळत आहे. यामध्ये एकीकडे आठ दिवसांपासून पडणारा रिमझिम पाऊस, तर दुसरीकडे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव आणि अन्य एका ठिकाणी जनावरांना लंपी स्क्रीन आजार झाल्याचे दिसून आले.   

एकीकडे पावसाची रिपरिप, दुसरीकडे सोयाबीनवर कीड तर अन्यत्र जनावरांना लंपी स्क्रीन आजार   

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर ः रोजच पडणारा सर्वदूर पाऊस, ढगाळी वातावरण यामुळे गेल्या सहा दिवसांपासून जिंतूर तालुक्याला सूर्यदर्शन झालेच नाही. 
आठ ऑगस्टचा अपवाद वगळता सात दिवस तालुक्यात सर्वदूर हलका, मध्यम स्वरुपाचा भीजपाऊस रोजच पडत आहे. सुरुवातीचे तीन दिवस दिवसभर ऊन व रात्री पाऊस अशी स्थिती होती. त्यानंतर सतत रिमझिम पाऊस सुरूच आहे. मधूनच हलक्या व मध्यम पावसाच्या सरी पडत आहे. या दिवसांत सातत्याने ढगाळी वातावरण राहत असल्याने शनिवार (ता.१५) पर्यंत तालुक्याला सूर्यदर्शन झालेच नाही.

रविवारी सातव्या दिवशीही पहाटेपासूनच पावसाची भरभूर सुरू झाली असून पावसाळी वातावरणामुळे सायंकाळपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. या सततच्या पावसाळी वातावरणामुळे हवामानात बदल होऊन हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. यावर्षी सुरवातीपासून पिकांना पोषक पाऊस झाल्याने तसेच पिकवाढसाठी आवश्यक वातावरणामुळे कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद व इतर पिके चांगली बहरली आहेत. अंतरमशागतीची कामे जोरात सुरू केली. कपाशीला फुले, पाते लागत आहे. पावसाळ्यातील शेतकऱ्यांच्या खर्चाचे नियोजन अवलंबून असलेल्या मुगाचे पिक हाती आले असून बहुतेक भागात मुगाची कामे सुरू आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने असे आनंदाचे दिवस असताना सततच्या पावसामुळे मशागतीच्या कामांना व्यत्यय असून रोजच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल व लवणाच्या जमिनीत दलदल होत असल्याने पिके पिवळी पडून त्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. सततच्या भीज पावसामुळे विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल.  

हेही वाचा - रिमझिम पावसाने सुखावले हिंगोलीकर...

सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव  
पूर्णा ः मागील बावीस दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे सुर्यदर्शन झाले नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया होत नसल्याने व अश्लेषा नक्षत्रामध्ये सरीवर सरी, रिमझिम पाउस पडत आहे. परीणामी सोयाबीन उस व इतर पिकावर रसशोषक किटकाचा त्यात पांढरी व काळे ठिपके असलेले मोठ्या आकाराची अळी, तुडतुडी अळी, काळे व तांबडे केसाळ अस्वल, खरपडे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. खरीप पेरणी मृग नक्षत्रामध्ये आठ जुनला पडलेल्या पावसावर केल्याने व पिक जगवण्यासारखा पाउस सातत्याने पडत राहिल्याने सर्वच पिकांची वाढीची अवस्था खुप चांगली आहे. परंतू, सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन पिकावर विविध अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन मागील पाच वर्षात कधीच एवढे समाधानकारक वाढ, फुल व फळधारणा झाली नाही त्यांच्या पटीत या वर्षी चांगले आहे परंतु अळीचा प्रादुर्भाव वेळीच नष्ट केला तर सोयाबीनचे उत्पादन चांगले होणार आहे. त्यावर कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्रज्ञ दिंगबर पटाईत व माहिती विभागाचे प्रमुख यु. एन. आळसे यांच्याशी संपर्क साधून कीटकनाशक फवारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

हेही वाचा - हुश्‍श ; प्रशासनाने घेतला मोकळा श्‍वास, का आणि कुठे ते वाचा...

झरी परिसरात जनावरांना लंपी स्क्रीन आजार 
झरी (ता.परभणी) ः परिसरात जवळच असलेल्या जलालपूर व सबर याठिकाणी जनावरांमध्ये हा आजार दिसून आल्यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार महिन्यापासून असलेले लॉकडाउन तसेच दुबार पेरणी अल्प प्रमाणात पाऊस अशा अनेक संकटांची मालिका अशा एक ना अशा अनेक मालिका चालू असताना तसेच मनुष्यावर कोरोना सारखा रोग आल्यामुळे आधीच शेतकरी हैराण आहेत. त्यातच त्याच्या पशुधनावर हा आजार आल्यामुळे संकटाची मालिका शेतकऱ्यांवर चालू झाली आहे. परिसरात आता पशूधन आजाराची लागण झाल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे जनावरांना लांब लांब बांधावे तसेच एकाच पदावर जनावरांना पाणी पिऊ देऊ नये शक्यतो आजारी जनावरास इतर जनावरापासून दूर ठेवावे तसेच हा आजार माशांपासून होत असल्यामुळे जनावरांच्या अंगावर माशा बसू देऊ नये, गोठ्यामध्ये फवारणी करून घ्यावी ह्या आजारात सात दिवसात ट्रीटमेंटनंतर पूर्णपणे बरा होतो. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा अशी माहिती डॉ.पशुवैद्यकीय अधिकारी अजय धमगुंडे यांनी ‘सकाळ'शी बोलताना दिली.   
 
संपादन ः राजन मंगरुळकर