किलोभर सोयाबीनही झाले नाही खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

उस्मानाबाद - जाचक अटींमुळे शासनाच्या आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर अद्याप एक किलो सोयाबीनही खरेदी झालेले नाही. दुसरीकडे चांगल्या दर्जाचे सोयाबीन व्यापारी शेतकऱ्यांकडून बेभाव खरेदी करीत आहेत. त्यामुळे शासनाचे अधिकृत खरेदी केंद्र असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झाली आहे. 

उस्मानाबाद - जाचक अटींमुळे शासनाच्या आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर अद्याप एक किलो सोयाबीनही खरेदी झालेले नाही. दुसरीकडे चांगल्या दर्जाचे सोयाबीन व्यापारी शेतकऱ्यांकडून बेभाव खरेदी करीत आहेत. त्यामुळे शासनाचे अधिकृत खरेदी केंद्र असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झाली आहे. 

यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते; मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पीकवाढीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर पीक जगविले; परंतु सोयाबीन ऐन काढणीला आले असताना परतीच्या पावसाने तडाखा दिला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. काही शेतकऱ्यांना एकरी पाच ते सहा क्‍विंटल उतारा मिळाला. सध्या सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. शासनाचा हमी भाव दोन हजार 775 रुपये आहे. या दरापेक्षा कमीने खरेदी करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. सोयाबीनमध्ये बारा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ओलावा नसावा, सोयाबीनचे काड जास्त नसावे अशा एक ना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, उमरगा, मुरूम या चार ठिकाणी ता. 27 ऑक्‍टोबरपासून खरेदी केंद्र सुरू झाली आहेत; मात्र या चारही खरेदी केंद्रांवर अद्याप एक क्विंटलही सोयाबीनची खरेदी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्र असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थिती झाली आहे. यंदाच्या हंगामात अतिपावसाने काही ठिकाणी सोयाबीन खराब झाले आहे. जाचक अटी, तसेच खरेदी केंद्रांवर वीस ते तीस दिवसानंतर पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांकडे दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. सध्या रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू असल्याने बियाणासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीतून ताबडतोब पैसे आल्याशिवाय गत्यंतर नाही; परंतु केंद्रावरील खरेदीच्या जाचक अटी, पैसे मिळण्यास दिरंगाईमुळे शेतकरी शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्राकडे फिरकलेच नाहीत. 

आजपासून मका खरेदी 

जिल्ह्यात मका खरेदीसाठी आठ केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून (ता. सात) जिल्ह्यात भूम, तुळजापूर येथे खरेदी केंद्रे सुरू केली जात आहेत. एक हजार 365 रुपये प्रति क्विंटल असा शासनाचा दर आहे. परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. 

Web Title: one Kg soybean was not to buy

टॅग्स