अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत जवानाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील तुरोरी येथे मंगळवारी (ता. सहा) पहाटे अडीच वाजता घडली. 

उस्मानाबाद : राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत जवानाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील तुरोरी येथे मंगळवारी (ता. सहा) पहाटे अडीच वाजता घडली. 

बापू ज्ञानराज गायकवाड (वय 31, रा. आष्टा(ज), ता. उमरगा) असे मृताचे नाव आहे. ते राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत होते. नुकतेच ते खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. बापू गायकवाड हे सोमवारी रात्री बसने मुंबईहून गावाकडे निघाले होते. मध्यरात्री तुरोरी येथे उतरल्यानंतर ते रस्त्याच्या बाजूला थांबले असता अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

राज्य राखीव पोलिस दलामध्ये (एसआरपी) सेवेत असताना त्यांनी कठोर परिश्रम घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. प्रशिक्षणासाठी थोडा अवधी असल्याने ते गावाकडे आले होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक वर्षाचा मुलगा, बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in the crash