परभणी महापालिका हद्दीतील एक हजार 305 अतिक्रमणे हटविणार- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

गणेश पांडे
Wednesday, 3 March 2021

आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी व आमदार विक्रम काळे यांनी परभणी महानगर पालिका हद्दीतील बेसुमार अतिक्रमणांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला

परभणी ः महानगर पालिका हद्दीतील चौकांसह रस्त्या-रस्त्यांवरील एक हजार 305 अतिक्रमणे महापालिकेव्दारे लवकरच हटवल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी व आमदार विक्रम काळे यांनी परभणी महानगर पालिका हद्दीतील बेसुमार अतिक्रमणांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्याव्दारे महानगर पालिका हद्दीतील शासकीय जागा, महापालिकेच्या जागा, तसेच मुख्य चौकांसह रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा, बाजारपेठ वगैरे भागात हजारो अतिक्रमणे विसावली आहेत, असे निदर्शनास आणून या अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात महा पालिकेच्याव्दारे ठोस व कठोर कारवाई होत नाही, असे नमूद केले. विभागीय महसूल अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मागील वर्षी या अतिक्रमणकर्त्यांना तात्काळ हटवावे, अशा सूचना दिल्या होत्या.

परंतु परभणी महापालिकेने कारवाई केली नाही. अतिक्रमणे हटवली नाहीत. फुटपाथवरील अडथळे दूर केले नाहीत. हॉकर्स झोनही निर्माण केले नाहीत, असे स्पष्ट केले. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास विभागीय आयुक्तांव्दारे वांरवार सूचना दिल्या गेल्या होत्या. हे स्पष्ट करीत परभणी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांदकामे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका दाखल केली. या रिट याचिकेत न्यायालयाने अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याकरिता ता. 31 जानेवारी पर्यंत स्थगिती दिली. न्यायालयाच्या या स्थगितीमुळे 31 जानेवारी 2021 पर्यंत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने सर्वेक्षण करून एक हजार 305 अतिक्रमणांची यादी तयार केली आहे. दहा फेब्रुवारी 2021पासून सद्यस्थितीत 240 पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यात येत असून उर्वरित सर्व अतिक्रमणे काढण्याची कारवाई, महापालिकेकडून केली जाईल, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिक व व्यावसायिक यांना राहती घरे व व्यवसायाच्या ठिकाणी नाल्यावर बांधलेले ओटे, फऱश्यांचे आवरण, तसेच नालीच्या समोर उभारलेली कच्ची व पक्की अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, असे निर्देश दिल्या गेले आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शहरात हॉकर्स झोन तयार करण्यासाठी फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असून फेरीवाला प्राथमिक झोन तयार करण्यात आले आहेत, सदर कारवाई अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेने कळवली असल्याचे शिंदे यांनी सभागृहात नमूद केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand 305 encroachments will be removed from Parbhani Municipal Corporation Urban Development Minister Eknath Shinde parbhani news