बीएलओच्या मानधनात हजाराने वाढ

हरी तुगावकर
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

घरोघरी जावून काम केल्याबद्दल आणखी एक हजार मिळणार

लातूरः  मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची महत्वाची भूमिका आहे. आपले कामकाज संभाळून हे अधिकारी मतदार याद्याचे काम करीत असतात.

त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना देण्यात येणाऱया मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचे आदेश आयोगाने दिल्यानंतर याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. तसे आदेशही काढले आहेत. तसेच या बीएलओंना मतदार यांद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आणखी एक हजार रुपये दिले जाणार आहेत.

राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये केंद्रस्तरीय अधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱयाद्वारे विशेषतः मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबवणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणीसाठी घरोघऱी जावून मतदार नोंदणी करणे, तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे आदी कामे हे बीएलओ करीत असतात. तसेच छायाचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपुर्णतः अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना सहाय्य करणे, मतदारांना मतदार चिठ्‌ठी वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इत्यादी कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करीत आहेत.

ही कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असल्याने त्यांना मानधन देण्यात येते. आतापर्यंत वर्षाला हे मानधन पाच हजार रुपये दिले जात होते. हे मानधन आता सहा हजार रुपये द्यावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शासनाने या बीएलओच्या मानधनात एक हजाराने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱयांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जावून केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी आणखी एक हजार रुपये वार्षिक मानधनही देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने बीएलओसाठी हा एक प्रकारे दिलासा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one thousand rupees increase in BLOs payment