दागिन्यांसह पळविले पिस्तूल : एकास वर्षभर सक्तमजुरी

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली. 

औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली. 

गजेंद्र दिलीपराव देशमुख (33, रा. एन-दोन, सिडको) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, देशमुख यांचे मामा (फिर्यादीच्या आत्याचे पती) मधुकर बापूसाहेब जाधव (32, रा. ब्रिजवाडी) हे बाहेरगावी गेले होते व देशमुख हे त्यांच्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी रोज रात्री चक्कर मारत होते. 3 एप्रिल 2019 ला रात्री देशमुख स्वत:चे काम आटोपून मामाच्या घराकडे गेले असता खिडकीचे ग्रील काढल्याचे व सीसीटीव्हीचे वायर तुटल्याचे दिसून झाले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, परवाना असलेले पिस्तूल व दागिने असा सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले; मात्र घरातील 20 काडतुसे घरामध्ये विखुरलेली दिसून आली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी प्रशांत ढोबरे याला अटक केली.

खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी आठजणांच्या साक्षी नोंदवल्या. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्षी-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी प्रशांत ढोबरे याला भारतीय दंड संहितेच्या 380 व 354 कलमान्वये एक-एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येक कलमान्वये तीन हजार रुपये अशा सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एच. बी. भागडे यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one year jail to thief