ऑनलाइन पीक विमा तांत्रिक अडचणींच्या जाळ्यात

तानाजी जाधवर
गुरुवार, 18 जुलै 2019

- ऑनलाइन पीक विमा भरण्याच्या सरकारच्या प्रयोगास तांत्रिक अडचणींमुळे अडथळा येत असल्याचे दिसुन येत आहे.

- गेल्या दोन दिवसांपासुन आपले सरकार वेब पोर्टल तांत्रिक कारणाने बंद राहिल्याने पीक विमा भरण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत.

- त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जाची एन्ट्री होऊ शकत नसल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद  : ऑनलाइन पीक विमा भरण्याच्या सरकारच्या प्रयोगास तांत्रिक अडचणींमुळे अडथळा येत असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या दोन दिवसांपासुन आपले सरकार वेब पोर्टल तांत्रिक कारणाने बंद राहिल्याने पीक विमा भरण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जाची एन्ट्री होऊ शकत नसल्याचे चित्र आहे.

विविध कॉमन सर्व्हिस सेंटरवर ऑनलाइन पीक विमा अर्ज भरण्यासाठी दिवसभर शेतकऱ्यांची गर्दी दिसत असली तरी पोर्टलच बंद असल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी संध्याकाळी यामध्ये तांत्रीक अडचणी आल्यानंतर काहीवेळ ते सूरु झाल मात्र बुधवारी आणि गूरुवारी ते बंद राहिल्याने एखाद दुसरीच एंट्री झाल्याचे सीएससी सेंटर चालकानी सांगतले. 

दुसऱ्या बाजुला तलाठ्याकडुन सातबारा घेण्यासाठी सुध्दा विलंब होत असल्याचे दिसुन येत आहे. तिथेही संकेतस्थळाची गती कमी राहिल्याने दिवसातुन दहा ते पंधराच सातबारे निघत असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच ते सहा दिवस शेतकऱ्यांच्या हाती असुन मुदतवाढ मिळण्याची मागणी आता वाढु लागली आहे. 

गोंधळात-गोंधळ

पीक विमा हप्ता भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असुन ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा नाही  नसलेली पुरेशी गती तसेच वीज पुरवठ्याची अनिश्चितता यामुळे ऑनलाइन नोंदणी संथ गतीने सुरू आहे.जुलै अखेरीस मुदत संपत आल्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पण त्याचवेळी इंटरनेटची संथ गती व वीज पुरवठ्याचे लोडशेडिंग समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम असल्याचे दिसुन येत आहे.

"मंगळवारी संध्याकाळपासुन पोर्टलला तांत्रीक अडचणी येत आहेत, बुधवारी दिवसभर ही यंत्रणा बंद राहिल्याने अर्ज भरता आलेले नाहीत, गूरुवारी सकाळपासुनही ते सूुरु झालेले नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज पडुन आहेत." 
सुहास साळुंखे - सीएससी केंद्रचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online crop insurance is facing technica;l issues