परंपरागत जुगाराला ऑनलाइनची जोड, राज्यात सर्रास खेळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - पत्ते असो की मटका अथवा ऑनलाइन जुगारामुळे अनेकजण रात्रीतून उद्‌ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. अशांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेतील काहीजण जुगारबाजांसाठी बऱ्याचदा मेहेरबान असल्याने हा धंदा छुप्या पद्धतीने तेजीत आहे.

कोट्यवधींची उलाढाल दरदिवशी असून, राज्यात बंदी असतानाही सर्रास जुगार खेळला जातो. थातूरमातूर कारवाया होतात; पण जुगार थांबविण्यात यंत्रणेला मात्र यश आलेले नाही.  विरंगुळा म्हणून काही बड्या हॉटेल्स आणि क्‍लबमध्ये विशिष्ट खेळाच्या प्रकारांना अटी व शर्तींनुसार परवानगी दिली जाते; परंतु त्यात पैशांचा व्यवहार आल्यास तो जुगार ठरतो. अशावेळी पैशांचा व्यवहार होत असेल तर कडक कारवाई करून परवानगी रद्द करण्याचेही नियम आहेत. पोलिस यंत्रणेकडे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून बऱ्याचदा कारवायाही होतात; परंतु सातत्याचा अभाव, काही पोलिसांना जुगारबाजांकडून "अर्थ'पूर्ण तडजोड मिळत असल्याने जुगार वाढताच आहे. त्याला नव्याने उदयास आलेल्या ऑनलाइन जुगाराची मोठी साथ मिळत आहे. 
 
जुगार का चालतो? 

  • इंटरनेटच्या प्रगतीनंतर जुगार ऑनलाइन झाला. 
  • ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी. 
  • व्यक्तिगत पातळीवर जास्त जुगार खेळला जात असल्याने प्रत्यक्ष कारवाईला अडचण. 
  • पोलिस यंत्रणेतील काही जणांचे लागेबांधे, त्यामुळे कारवाया टाळल्या जातात. 

 
लुबाडणुकीचे प्रकार 
जुगार अनेकदा मद्यसेवनही करूनही खेळला जातो. त्यावेळी वाद होऊन गुन्हाही घडतो. बहुतांश वेळा एकाने पैसे जिंकल्यास त्याला इतर मिळून लुबाडतात. वर्ष 2014-15 मध्ये औरंगाबादेत कारवाईवेळी ग्रामीण पोलिसांनीच जुगार खेळणाऱ्यांची लूट केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यांचे पैसे, महागड्या वस्तू, मोबाईलही स्वत:कडे ठेवले होते. 
 
असे आहेत लागेबांधे 
अवैध क्‍लब अनेक शहरांत छुप्या पद्धतीने चालतात. कारवाईवेळी जुगार व्यावसायिकांशी पोलिसांचा संबंध येतो. जुगार खेळणाऱ्यांवर आधी ठोस कारवाई होते. पोलिसांकडून अडचण वाढल्यास जुगार व्यावसायिक ऑफर देऊ करतात. याचा स्वीकार यंत्रणेतील काहीजण करतात. तेथून लागेबांध्यांचा खेळ सुरू होतो आणि जुगाराचाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com