औरंगाबाद : शहर बस 'अब तक छपन्न'च

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्मार्ट सिटीतून शहर बस सुरू केली. टप्प्याटप्प्याने अवघ्या काही महिन्यात शंभर बस शहरात धावणार, असेही जाहीर
करण्यात आले. मात्र सात महिन्यानंतरही शंभर बसची प्रतीक्षाच असून, आतापर्यंत केवळ 56 बसच रस्त्यावर उतरल्या आहेत. 186 चालक-वाहकांची पदे रिक्त असल्यामुळे शहरवासीयांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

औरंगाबाद - मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्मार्ट सिटीतून शहर बस सुरू केली. टप्प्याटप्प्याने अवघ्या काही महिन्यात शंभर बस शहरात धावणार, असेही जाहीर
करण्यात आले. मात्र सात महिन्यानंतरही शंभर बसची प्रतीक्षाच असून, आतापर्यंत केवळ 56 बसच रस्त्यावर उतरल्या आहेत. 186 चालक-वाहकांची पदे रिक्त असल्यामुळे शहरवासीयांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सर्वांत मोठा प्रकल्प स्मार्ट बसचा राबविण्यात आला. 36 कोटी रुपये खर्च करून टाटा कंपनीकडून महापालिकेने शंभर बस खरेदी केल्या. कंपनीने तीन टप्प्यात या बस देण्याची हमी दिली होती. दरम्यान बस चालविण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने एसटी महामंडळासोबत करार केला. त्यामुळे बस चालविण्याची आवश्‍यक कर्मचारी देण्याची जबाबदारी महामंडळावर आहे. सात महिन्यात आवश्‍यक चालक-वाहकांची भरती करण्यात महामंडळाला अपयश आले आहे. 23 जानेवारीला शहर बससेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यामुळे सात महिन्यात शंभर बस रस्त्यावर उतरणे गरजेचे होते. मात्र पूर्ण क्षमतेने शहर बस सुरू करण्यासाठी 186 चालक-वाहकांची गरज आहे. त्यासाठी नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच कर्मचारी प्राप्त होतील व शंभर बस चालविण्याचे
नियोजन केले जाईल. सध्या शहर बससाठी 189 चालक तर 94 वाहक उपलब्ध आहेत, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. 
 

शनिवारपासून चाचणी 
शहर बससाठी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची शनिवारपासून (ता. 17) चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीनंतर कर्मचारी उपलब्ध होतील, असे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत महामंडळातर्फे सांगण्यात आल्याचे आयुक्‍तांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 56 city bus in Aurangabad