अरेरे, पर्यटनासाठी आलेल्यांचा होतोय हिरमोड

राजाभाऊ नगरकर
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

येथील  पाटबंधारे विभागाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेने धरणावर जाण्यास पर्यंटकांना मनाई केल्याने अनेकांना आल्यापावली परतावे लागत आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे.

जिंतूरः आधीच परभणी जिल्हा पाणी, पर्यटन, शेती, औद्योगिकदृष्ट्या मराठवाड्यात मागासलेला म्हणून  परिचित आहे. यातच कधी नव्हे ते जिल्ह्यातील जिंतूरजवळील येलदरी धरण मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच शंभर टक्के भरल्याची नोंद झाली आहे. ही बाब अनेक पर्यटकांंना समजल्यामुळे त्यांची पावले या धरणाकडे वळली खरी. मात्र, येथील  पाटबंधारे विभागाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेने धरणावर जाण्यास पर्यंटकांना मनाई केल्याने अनेकांना आल्यापावली परतावे लागत आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे.    

या आठवड्यात जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण तुडुंब भरले. जलविद्युत केंद्रातून वीज निर्मितीसुध्दा केली जात आहे. हा पर्यटकांसाठी कुतुहलाचा विषय असल्याने धरणाच्या जलाशयातील पाणीपातळी, वीजनिर्मितीची प्रक्रीया पाहण्यासाठी दूरवरून आलेले पर्यटक, शालेय विद्यार्थी धरणाच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. परंतु, येथील पाटबंधारे विभागाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेने धरणावर जाण्यास पर्यंटकांना मनाई केल्याने अनेकांना आल्यापावली परतावे लागत आहे. येथून जवळच लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर, औंढा येथील नागनाथ मंदिर, नर्सी नामदेव तसेच सिध्देश्‍वर धरण आहे. येथे आलेल्या अनेकांकडून येलदरी धरणालाही भेट दिली जाते, त्यामुळे पर्यटनाची मजा सोडून फेरफटका मारल्याचा अनूभव येत आहे.  

येलदरी धरण शंभर टक्के भरले
मागील तीन-चार दिवसांपासून येलदरी धरण शंभर टक्के भरले असून शुक्रवारी (ता.२२) सकाळी खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन वक्र दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आली असून ९८७.७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे येलधरी धरणातील पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या शुक्रवारी (ता.२२ सकाळी आठ वाजता) येलदरी धरणात ९३४.४४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मितीद्वारे पूर्णेच्या पात्रात १९६३ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

येलदरी परिसरात पर्यटकांचा वाढतोय ओढा 
पाटबंधारे विभागाने सुरक्षेच्या या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कडक सुरक्षा व्यवस्था केल्याने पर्यटकांना धरणावर जाण्यास परवानगी मिळेना तसेच पासेसचीही व्यवस्था नाही. त्यामुळे खर्च करून आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होऊन त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. 

पूर्वीप्रमाणे करावी व्यवस्था
पूर्वी धरण पाहण्यासाठी आलेल्यांना पास दिल्या जात असे किंवा त्यांना सुरक्षा चौकीवरील रजिस्टरमध्ये सविस्तर नोंद करावी लागे. याकरिता धरण प्रशासनाने पूर्वीप्रमाणे वा शक्य असेल ती व्यवस्था करून धरण पाहण्याची परवानगी द्यावी, अशी पर्यटकांची मागणी आहे.

सिध्देश्वर धरण ९८ टक्के भरले
प्राप्त माहितीनुसार पूर्णा नदीपात्रात येलदरी धरणाच्या खालील भागात असलेले सिध्देश्वर धरण शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ९८.१९ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आवक सुरूच असल्याने धरण लवकरच तुडुंब भरण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oops, tourists are hurting