परभणीत रिंगरोडवरील अतिक्रमणधारकांचा विरोध अखेर मावळला

PRB
PRB

परभणीः वसमत रस्त्यापासून कॅनॉलपर्यंतच्या शंभर फुटाच्या रिंगरोडवरील मोजक्या अतिक्रमणधारकांचा विरोध अखेर गुरुवारी (ता.१२) मावळला व महापालिकेने निर्धाराने सुरु केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर सुरवात झाली. 

रस्त्याचा विकास करावा
महापालिकेने केलेला निर्धार कायम ठेवावा व दबावापोटी सर्वसामान्यांवर अन्याय करू नये, अतिक्रमणे हटविण्याबरोबरच त्या रस्त्याचा विकास करावा, अशा भावना नागरिकांकडून होत आहेत. बाह्यवळण रस्ता म्हणून २५-३० वर्षापासून या ३० मीटरच्या रस्त्यावरील नागरिकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी लॉकडाउनपूर्वी नोटीसा बजावल्या होत्या. परंतू, एकानेही ती काढली नव्हती. अखेर बुधवारी (ता.दहा) पालिकेचा लवाजमा दाखल झाल्यानंतर ज्यांची पक्की अतिक्रमणे होती त्यांच्यामध्ये खळबळ उडाली. अनेकांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला. परंतू, बहुतांश लोकप्रतिनिधींनी नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना केल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतू, काही तांत्रिक अडचणीमुळे ही मोहीम थांबवावी लागली. त्यामुळे गुरुवारी ही सुरू होणार का नाही याविषयी साधक-बाधक चर्चा सुरू होती. 


आयुक्तांसमवेत मॅरॉथॉन बैठक 
आयुक्त देविदास पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन व सारासार विचार करून पथकाला पाठबळ देऊन अतिक्रमण हटाव मोहीम सक्तीने राबवण्याचे आदेश दिले. 

दहा वाजताच पथके पुन्हा दाखल 
उपायुक्त महेश गायकवाड, प्रदीप जगताप, देविदास जाधव, नगर रचना संचालक रविंद्र जायभाये, नगररचनाकार किरण फुटाणे, अभियंता विभागाचे वसीमखान पठाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड हे गुरुवारी (ता.११) सकाळी दहा वाजताच यंत्रसामुग्री व लवाजम्यासह दाखल झाले. नवा मोंढ्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट व त्यांचे कर्मचारी, एका विशेष तुकडीसह दाखल झाले. पुन्हा वसमत रस्त्याच्या कोपऱ्यावर वाद सुरु झाला. येथे ही अनेक जण कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र होते. परंतू, पथक प्रमुखांनी आयुक्तांचा इशारा मिळताच जेसीबी यंत्राने पाडकामास सुरवात केली. या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ देखील झाली. परंतू, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व मोहिम सुरुच ठेवली. पथक प्रमुखांनी अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे हटविण्यासाठी काही वेळ दिला. 

मोहिम औटघटकेची ठरू नये 
महापालिकेने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम औटघटकेची ठरू नये. काढलेली अतिक्रमणे पुन्हा होऊ नये म्हणून दुतर्फा नाल्या व रस्ता व सुशोभितीकरण करावे, शहरात यापुर्वी काढलेली व पुन्हा पुर्ववत झालेली डनलप रोड, ग्रॅन्ड कॉर्नर, शिवाजीनगर, वसमत रोड, जिंतुर रोड, नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरीबाजार, गंगाखेड रोडवरील देखील अतिक्रमणे काढावीत, सर्वांना समान न्याय द्यावा, लोकप्रतिनिधींनी देखील केवळ बड्या अतिक्रमण धारकांचे हित पाहू नये, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. 
 
संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com