Video and Photos : महापोर्टलच्या विरोधात नांदेडमध्ये मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

महापरीक्षा पोर्टल रद्द करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच घेण्यात याव्यात. ज्यामुळे महाराष्ट्रातील होतकरू युवक-युवतींचे होणारे प्रचंड नुकसान थांबेल, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.  

नांदेड : ऑनलाइन भरतीमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे तात्काळ पोर्टल भरती बंद करुन ऑनलाइन परीक्षा घ्याव्यात, या मागणीसाठी सोमवारी (ता.१७) नांदेडमध्ये मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. आनंदनगर येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 


नांदेड ः युवकांनी महापोर्टलची अंत्ययात्रा काढली होती. (छायाचित्र ः सचिन डोंगळीकर)

महापोर्टलची अंत्ययात्रा काढून संताप
महापोर्टलमध्ये कोणतेही पारदर्शकता नाही. प्रश्‍न पत्रिका दिली जात नाही. उत्तर पत्रिकाही नाही. टीक मार्क केलेली पत्रिकाही मिळत नाही. सर्वकाही कंपनीला अधिकार आहेत. जर पोर्टल बंद केले नाही तर सरकार युवक विद्यार्थी उलथून टाकतील. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी महापोर्टलची अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त केला. 

Image may contain: 15 people, people standing, crowd and outdoor
नांदेड ः मोर्चात सहभागी झालेले युवक. (छायाचित्र ः सचिन डोंगळीकर)

एमपीएस्सी मर्फतच परीक्षा घ्यावी
महापरीक्षा पोर्टलमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे पोर्टल बंद करण्यात यावे, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच युवक-युवतींची एकमुखाने मागणी आहे. तसेच, पुढे होणाऱ्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यंत्रणे मार्फत घेतल्यास हुशार, गरीब आणि होतकरू मुलांना योग्य न्याय देता येईल.

महापोर्टलमार्फतच्या परीक्षांत होतोय सावळा गोंधळ
तत्कलीन सरकारकडून सरकारी पद भरतीसाठी तयार केलेल्या महापरीक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. यामध्ये, सामुहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नांची पुनरावृत्ती होणे, परीक्षेत मोबाइल; तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, योग्य बैठक व्यवस्था नसणे, वेळेवर परीक्षा न होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, डमी उमेदवारांना पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न होणे अशा अनेक घटनांमुळे महापरीक्षा पोर्टलचा भ्रष्ट कारभार महाराष्ट्रासमोर आला आहे. म्हणून हे पोर्टल तात्कळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition in Nanded against MahaPortal Nanded News