लातूरात प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय कापडी पिशव्या !!

सुशांत सांगवे
बुधवार, 27 जून 2018

नेहमीप्रमाणे राजीव गांधी चौकात ग्राहकांची गर्दी होती. कोणी दुधासाठी तर कोणी भाज्या खरेदीसाठी आले होते. त्यासाठी प्रत्येकाच्या हातात होत्या कापडी पिशव्या. हे चित्रच स्पष्ट करते की, लातूरकरांनी प्लॅस्टिक बंदीचे स्वागत केले आहे.

लातूर -  नेहमीप्रमाणे राजीव गांधी चौकात ग्राहकांची गर्दी होती. कोणी दुधासाठी तर कोणी भाज्या खरेदीसाठी आले होते. त्यासाठी प्रत्येकाच्या हातात होत्या कापडी पिशव्या. हे चित्रच स्पष्ट करते की, लातूरकरांनी प्लॅस्टिक बंदीचे स्वागत केले आहे.

प्लॅस्टिक पिशवी वापरली की प्रथम पाच हजार रुपयांचा दंड हे व्यापारी, सामान्य नागरिक यांच्यापर्यंत पोचले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला आहे.  दुसरीकडे, कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे. काहीजण घराबाहेर पडताना कापडी पिशवी घडी घालून स्वतःजवळ ठेवत आहेत. हे बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर जाणवत आहे.

राजीव गांधी चौकात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी भाजी-दूध-फुले विक्रेते मोठ्या संख्येने बसतात. तेथे खरेदीसाठी गर्दीही मोठ्या प्रमाणात होते. या गर्दीत प्रत्येकाच्या हातात आता कापडी पिशवी दिसू लागली आहे. काहीजण पोते घेऊनही बाजारात खरेदीसाठी येत आहेत. हेच चित्र मार्केट यार्ड भागातही दिसत आहे. याबाबत व्यापारी रमेश बिराजदार म्हणाले, "बाजारात गेलं की येताना प्लॅस्टिक पिशवीत वस्तू आणायची, याची सवयच अनेकांना लागली आहे; त्यामुळे बंदीनंतर दोन दिवस व्यवसाय कमी झाला. आता तो पूर्ववत झाला आहे. लोक स्वतःहुन कापडी पिशव्या आणत आहेत.

Web Title: option for plastic bag is cotton bag in latur