कळमनुरीत पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

संजय कापसे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुर परिस्थिती यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची संयुक्त पाहणी करून पंचनामे करावेत तसेच त्याचा  अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी रविवारी (ता. 29) दिले आहेत.

कळमनुरी तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे. शेतात काढून ठेवण्यात आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून सोयाबीनची किमान पंचवीस ते तीस टक्के नुकसान झाले आहे. तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याशिवाय कापूस व इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिके पुराखाली सापडली असून पुरामुळे शेतजमीनही खरडून गेली आहे. या भागात आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, पंचायत समिती उपसभापती अजय सावंत, उपसरपंच विजय बोंढारे यांच्या पथकाने परिसरात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर तहसीलदार वाघमारे यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी संयुक्तपणे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to do panchanam of wasted crops