‘तत्काळ’च्या काळाबाजार प्रकरणी चौकशीचे आदेश  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात तत्काळ तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. याप्रकरणी ‘सकाळ’ने रविवारच्या (ता. २१) अंकात बातमी प्रकाशित केली. तिची दखल घेत दक्षिण मध्य रेल्वेचे डिव्हिजनल सिक्‍युरिटी कमांडर सी. के. पांडे यांनी आरपीएफला चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.  

औरंगाबाद - येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात तत्काळ तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. याप्रकरणी ‘सकाळ’ने रविवारच्या (ता. २१) अंकात बातमी प्रकाशित केली. तिची दखल घेत दक्षिण मध्य रेल्वेचे डिव्हिजनल सिक्‍युरिटी कमांडर सी. के. पांडे यांनी आरपीएफला चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.  

शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या दलालांमार्फत आरक्षण कार्यालयात तत्काळच्या तिकिटांचा काळाबाजार करीत आहेत. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराई असल्यामुळे यातून त्यांची बक्‍कळ कमाई होत आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे पूर्वीच्या दलालांऐवजी कमिशन बेसवर नवे दलाल लावून हे काम करून घेतले जात आहे. तिकिटांच्या काळाबाजाराचा हा विषय दोन वर्षांपासून ‘सकाळ’ने सातत्याने लावून धरला. त्यामुळे आरक्षण कार्यालय वर्षभर दलालमुक्‍त होते. मात्र, तत्काळ तिकिटांसाठी असलेला सुरक्षा जवान आरपीएफने हटविला. त्यामुळे आता पुन्हा तिकिटांच्या रांगेत दलाल उभे राहू लागलेत. दरम्यान, प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना एका तिकिटामागे ५०० ते एक हजार रुपये जास्तीचे मिळत आहेत. त्यामुळे ते एजंटाला तिकिटामागे शंभर ते ३०० रुपयांपर्यंत कमिशन देत आहेत. या प्रकारावर ‘सकाळ’ने आपल्या बातमीतून प्रकाश टाकला. तिची दखल घेत डिव्हिजनल सिक्‍युरिटी कमांडरने आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. 

आरपीएफच्या समोर हा काळाबाजार सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडून कुठलीच कारवाई होत नाही. याबाबत आता रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. मलासुद्धा तत्काळचे तिकीट मिळाले नाहीत. चार तिकिटांपेक्षा जास्त प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळत नाही. त्यामुळे दलालांची घुसखोरी कमी करून औरंगाबादचा तत्काळ कोटा वाढवावा.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती.

रेल्वेच्या आरक्षण कार्यालयात तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली आहे. यावर आमचे लक्ष आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दलालांवर कारवाई करण्याबरोबर त्यांना मदत करणाऱ्यांवरही आम्ही कडक कारवाई करू. 
- सी. के. पांडे, डिव्हिजनल सिक्‍युरिटी कमांडर (आरपीएफ)

Web Title: Order of inquiry in the 'black market' of 'Immediate'