महावितरणला ग्राहक मंचाचा दणका

सुषेन जाधव
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

शेतकऱ्याला एक लाख 84 हजार रुपये देण्याचे आदेश 
 

औरंगाबाद : शेतात उभ्या असलेल्या महावितरणच्या डीपीत (रोहित्र) स्पार्किंग होऊन उसाला लागलेल्या आगीत शेती पिकाचे नुकसान झाले. या प्रकरणात ग्राहक मंचाने महावितरणला चांगलाच दणका दिला. मंचाने नुकसानभरपाईपोटी शेतकरी रघुवीरसिंग देविसिंग पवार (रा. पिंप्रीराजा, ता. औरंगाबाद) यांना एका महिन्याच्या आत एक लाख 84 हजार रुपये देण्याचे आदेश महावितरणला दिले.

प्रकरणाची सुनावणी मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्या संध्या बारलिंगे, किरण ठोले यांच्यासमोर झाली. प्रकरणात शेतकरी पवार यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. त्यानुसार श्री. पवार यांची विठ्ठलपूर शिवारात (पिंप्रीराजा) गट क्रमांक 6/9 मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील असणाऱ्या डीपीची महावितरणने देखभाल केली नाही. त्यात बिघाड होऊ पवार यांच्या शेतातील पाचटावर थिनग्या पडल्या. त्यामुळे लागूनच असलेल्या उसाने पेट घेतला. सदर प्रकारच्या नुकसानभरपाईसाठी श्री. पवार यांना जवळपास दोन वर्षे महावितरणचे उंबरठे झिजवावे लागले. त्यांना नुकसानभरपाईचा निर्णय उद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत होते; मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.

श्री. पवार यांच्यातर्फे सुमित एकबोटे व प्रभाकर गाडेकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ग्राहक मंचाने नुकसानभरपाईपोटी एक लाख 84 हजार 450 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: order to MSEB to pay farmer 1 lakh 84 thausand rs : Consumer forum