मराठवाड्याचा 'दुष्काळवाडा' कलंक मिटविण्यासाठी विकास परिषद

हरी तुगावकर
सोमवार, 10 जून 2019

  • लातूर येथे मराठवाडा विकास परिषदेचे आयोजन
  • दबावगट निर्माण करण्यासोबतच लोकप्रबोधनाचा जागर

लातूर :  मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा कलंक पुसून अनुशेष भरून काढावा याकरीता ता. 15 जूनला येथील दयानंद सभागृहात मराठवाडा विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शासनावर दबावगट निर्माण करण्यासोबतच याकामात लोकांचाही सहभाग आवश्यक असल्याने लोक प्रबोधनाचा जागरही करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे व स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाडा निझामाच्या 224 वर्षांच्या गुलामगिरीतून 17 सप्टेंबर 1948 ला मुक्त झाला. मराठवाड्याच्या मातीने मुक्त श्वास घेतला. 1956 ला भाषावार प्रांतरचना झाली. आणि 1960 ला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट सामील करण्यात आला.

मराठवाड्याच्या वाट्याला कायम उपेक्षाच आलेली आहे. संताचा विश्वमैत्रीचा संदेश देणारा, ऐतिहासीक वारसा लाभलेला लढाऊ बाणा असलेला मराठवाडा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मागासलेपणाचा कलंक घेऊन जगतो आहे. त्याला दिली जाणारी दुय्यमपनाची वागणूक संपायला तयार नाही. घटनेतील 371 (2) कलमाची पायामल्‍ली उघड केली जात आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा व सरकारचे दुर्लक्ष मराठवाड्याच्या मागासलेपणास कारणीभूत आहेत. 62 हजार कोटींचा आर्थिक अनुशेष ज्यामुळे शेतकरी व सामान्या नागरीक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडून देशात सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मराठवाड्यातील भिजत पडलेले रेल्वे मार्गाचे प्रश्‍न, कृषी, रोजगार, उद्योग, सिंचन, दळणवळण आणि शिक्षणातील वाढता अनुशेष हेच मागासलेपाणाचे मुख्य कारण आहे. आमच्या हक्‍काचे कृष्णेचे, उजणीचे पाणी पाहिजे असेल तर उच्च न्यायालायाचे दरवाजे ठोठावूनही मिळत नाहीत. राज्यपाल यांच्या आदेशाचे वळोवेळी सरकार उल्‍लंघन करताना दिसून येते. असे असले तरी मराठवाड्यातील जनतेने उठाव केला पाहिजे या करीता ही परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. वाघमारे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून दुग्धविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न व न्यायालयीन लढा व मराठवाड्यातील कृषी, उद्योग, रोजगार, रेल्वे व शिक्षणाचे प्रश्न यावर चर्चासत्र होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावेळी ॲड. मनोहरराव गोमारे, रणजित जाधव आदी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या :
- चार लाख हेक्टर जमिनीचा व 16 हजार कोटीचा सिंचन अनुशेष भरून काढावा
- उजनी धरणातून मराठवाडयाला २3.6 टीएमसी पाणी द्यावे
- गोदावरी खोर्‍यातून पश्‍चिम वाहिनी नद्याचे पाणी समुद्रात जाते, ते नद्या जोड प्रकल्पातून मराठवाड्यात आणावे
- कृष्णा खोर्‍याचे 7 टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यावे
- लोकसंख्येच्या प्रमाणात मराठवाड्यात वैद्यकीयच्या जागा द्याव्यात
- प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरु करावे
- आयआयटी, आयआयएम्स व आयुर्वेद विद्यापीठ मराठवाड्यात सुरू करावे
- मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यावर 70-30 या विभागीय निवड पध्दतीमुळे अन्याय होत आहे. ही पद्धत रदद्‌ करावी
- लातूर व उस्मानाबाद विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे
- लातूर व नांदेड येथे नियोजीत विभागीय आयुक्‍तालय सुरू करावे
- मराठवाड्यात उद्योगाला चालना द्यावी
- मराठवाड्यात कृषी पतपुरवठा वाढवावा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizing Marathwada Vikas Parishad at Latur