चिंताजनक, उमरग्यातील २२ जण ‘हॉयरिस्क’च्या यादीत

अविनाश काळे
बुधवार, 8 एप्रिल 2020

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सतरा जणांचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, एका कोरोनाग्रस्त रुग्णावर गैरवर्तनप्रकरणी मंगळवारी (ता. सात) रात्री गुन्हा नोंद झाला.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरासह तालुक्यातील एका गावात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच त्या व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाइकांसह नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत.

दरम्यान, शहरातील त्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक व संपर्कातील एकूण १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असले. तरी त्यातील १७ जण हायरिस्कच्या यादीत आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे. 

ग्रामीण भागातील एका गावातील जवळपास तीसहून अधिक नागरिकांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यांचा अहवाल तपासणीत निगेटिव्ह आले होते; मात्र पाच ते सहा दिवसांनंतरची स्थिती पाहता २२ जणांचा हॉयरिस्कच्या यादीत समावेश करण्यात आला असून, त्यातील १७ जणांचे स्वॅब बुधवारी (ता.आठ) पुन्हा तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

उमरगा शहर व तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती, जनता कर्फ्यू तसेच प्रत्येकाने घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. उपजिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत ११३ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आले होते. 

हायरिस्कच्या लोकांवर विशेष काळजी 
शहरातील त्या तरुणाच्या संपर्कातील १९ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत; तरीही आरोग्य विभाग धोका पत्कारायला तयार नाही. त्यातील १७ जणांची नावे हायरिस्कच्या यादीत घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. तर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या त्या गावातील स्थिती तूर्त समाधानकारक असली तरी ऐनवेळी परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे प्रशासन विशेष काळजी घेत आहे. २२ जणांना हॉयरिस्कच्या यादीत घेण्यात आले असून, बुधवारी त्यातील १७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले असून, मंगळवारी बलसूर येथील एका आरोग्य कर्मचाऱ्यासह उपजिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर आणि रुग्णवाहिकेच्या चालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल बुधवारी (ता. आठ) उशिरा प्राप्त होणार होता. 

हेही वाचा :  बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

शहरात आरोग्य विभागाचे आठ पथक 
शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यासाठी आठ आरोग्य विभागाच्या पथकामार्फत वार्डनिहाय फिरून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनासंबंधी लक्षणे जाणवू लागलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रशासनाने पॉझिटिव्ह रुग्णाच्या गल्लीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

एका कोरोनाग्रस्तावर गैरवर्तनप्रकरणी गुन्हा 
येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णावर गैरवर्तनप्रकरणी मंगळवारी (ता. सात) रात्री गुन्हा नोंद झाला. या कोरोनाबाधित रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्याने अन्य व्यक्तींशी संपर्क टाळणे गरजेचे असताना तो आयसोलेशन वॉर्ड सोडून बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतो. तसेच गुळण्या करुन थुंकतो. वैद्यकीय पथकाने अनेकदा समजावून सांगूनही तो जाणीवपूर्वक गैरवर्तन करीत आहे. त्याच्या या गैरवर्तवणुकीमुळे कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ शकतो, अशी तक्रार वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज सिद्रामप्पा दानाई यांनी तीन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरुन मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पॉझिटिव्ह तीन रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. शहरात आठ पथकाकडून लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. कोरोनाशी संबंधित लक्षणे असल्यास तातडीने स्वॅब घेतले जाणार आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व नातेवाइकांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्यातील बहुतांश जणांची नावे हायरिस्कच्या यादीत आहेत. त्यातील एका गावातील जवळपास १७ जणांचे स्वॅब परत तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 
- डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad 22 in the list of 'highrisks'