कोरोनाला हरवायचंय, जिल्हाधिकाऱ्यांची जनतेला भावनात्मक साद

सयाजी शेळके
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी प्रभावी उपाययोजना राबविल्या; मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढल्याने कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा, अशी भावनात्मक साद जनतेला घातली आहे.

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी प्रभावी उपाययोजना राबविल्याने उस्मानाबाद जिल्हा रविवारपर्यंत (ता. १०) कोरोनामुक्त होता. मात्र तब्बल ३८ दिवसांनंतर सोमवारी जिल्हयातील परंडा तालुक्यात एक रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या काही दिवसांत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या तेरावर पोचली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे भावुक झाल्या आहेत. त्यांनी जनतेला पत्र लिहून मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत अनेक आदेश काढले आहेत. त्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

एप्रीलच्या सुरवातीला मुंबईहून उमरगा तालुक्यात आलेल्या एकासह दोघांना कोरोनाची बाधा झाली होती. तर लोहारा तालुक्यातही एक रुग्ण आढळला होता; मात्र उपचारानंतर हे तिघेही बरे होऊन घरी परतले. त्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे अशा महानगरातून आलेल्या काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका जिल्ह्यात निर्माण झाला आहे.

दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर जिल्हा कोरोनापासून दूर ठेवण्यात जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला यश आले होते. मात्र आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागलीआहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या सोळावर पोचली असून, सध्या तेरा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर तिघे बरे होउन घरी परतले आहेत. यातील तिघांना घरी सोडण्यात आले असून इतर तेरा जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भावुक होत जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले.

येथे क्लिक करा - बिहार राज्यातील ५८ मजुरांचे पलायन

त्यांनी पत्रामध्ये नमूद केलेली एक काल्पनिक गोष्ट येक्षे देत आहोत. आग विजवणाऱ्या चिमणीला कावळा हसत हसत विचारतो, की तुझ्याने आग विझणार नाही. तेव्हा चिमणी हसत उत्तर देते अन्‌ म्हणते, मला नक्की माहिती आहे की माझ्यामुळे आग विझणार नाही; परंतु मी प्रयत्न करीत आहे. थेंबे थेंबे तळे साचे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आग विझवणाऱ्यामध्ये माझा उल्लेख असेल.... 
ही गोष्ट नमूद करीत जिल्हाधिकारी मुंडे यांनी ही कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकानेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मदत करावी, अशी भावनात्मक साद जनतेला घातली आहे.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची योग्य माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवा, संशयित असेल तर त्यांचा शोध घेणे आदी उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात असे आवाहन पत्राद्वारे केले आहे. आता जिल्हावासियांनीही त्यांना प्रतिसाद देत नियमांचे काटेकोरपणे पालन करीत कोरोनाला हरविण्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे, असे वाटते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Collector's emotional appeal to the people