
खबरदारी म्हणून शासनाने जवाहर नवोदय विद्यालयातील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचे वर्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : शहरातील नवोदय विद्यालयातील नऊ जणांसह एकाच कुटुंबातील सात जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून बुधवारी (ता. १७) देण्यात आली. येथील जवाहर नवोदय विद्यालयातील एक शिक्षक पॉझिटिव्ह आला होता. या पाठोपाठ सात विद्यार्थी आणि शिक्षिका पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली शेवटची
खबरदारी म्हणून शासनाने जवाहर नवोदय विद्यालयातील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचे वर्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बरोबरच शहरातील लातूर रस्त्यावरील एकाच कुटुंबातील सात जण पॉझिटिव्ह आले आहेत. तुळजापूर तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी वाढलेल्या रुग्णांची संख्या नागरिकांच्या आरोग्यासाठी अडचणीची होऊ शकते.
या संदर्भात येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव म्हणाले, जवाहर नवोदय विद्यालयातील नऊ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन शिक्षक आणि सात विद्यार्थ्यांसह एक शिक्षक आणि एक महिला शिक्षकाचा त्यात समावेश आहे. नवोदय विद्यालयातील संपर्कातील दहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे म्हणाले की, शहरातील जवाहर नवोदय विद्यालय तसेच तुळजाभवानी महाविद्यालय येथे निर्जंतुकीकरण बुधवारी करून घेण्यात आले आहे.